तेंदूपत्ता मजूर घेऊन जाणार्या बसला अपघात 1 ठार तर 10 जखमी

0
8

आल्लापल्ली,दि.१३:  तेंदूपत्ता संकलनासाठी मजूर नेणारी खासगी बस उलटल्याने एक मजूर ठार, तर १० जण जखमी झाल्याची घटना आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील उमानुर गावाजवळ आज मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.ठार झालेला मजूर हा साकोली तालुक्यातील असल्याचे वृत्त आहे.

साकोली येथून एका खासगी बसद्वारे ७४ मजुरांना सिरोचा तालुक्यातील पातागुडम येथे तेंदू संकलनासाठी नेण्यात येत होते. दरम्यान उमानूर पहाडाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. अपघाताची माहिती मिळताच अहेरी येथून १०८ रुग्णवाहिकेचे डॉ.त्रिवेंद्र कटरे, हेल्पींग हँडसचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रतीक मुधोळकर व त्यांचे सहकारी पहाटे ३ वाजता पहाडावर पोहचले . तोपर्यंत सिरोंचा येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने १० जखमींना अहेरीत आणण्यात आले.  तसेच एका ट्रकद्वारे किरकोळ  ६० जणांना पहाडावरून उमानूर गावात नेण्यात आले. अपघातानंतर बसचालक, क्लिनर व अन्य एकाने घटनास्थळावरुन पळ काढला. जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागानेही रात्रीच घटनास्थळ गाठुन जखमींना मदत केली. १० जखमीपैकी एकाला गडचिरोलीला हलविण्यात आले असून, अन्य जखमीवर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.