पत्रकार संरक्षण कायद्यान्वये पीआय कदमांविरुद्ध कारवाई करा मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
13

नागपूर,दि.13- अतिक्रमण विरोधी कारवाईच्या वृत्तांकनासाठी गेलेले ज्येष्ठ पत्रकार विनायक पुंड यांच्यावर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्लाप्रकरणात कदम यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी,या मागणीचे निवेदन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ व नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे देण्यात आले. या प्रकरणाची संपूर्ण माहिती फडणवीस यांनी पत्रकारांकडून घेतली. पत्रकारांसाठी कायद्यानुसार या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनायक पुंड, राहुल पांडे, जगदीश जोशी, रणजित देशमुख, अविनाश महाजन, मंगेश राऊत, महेश बोकडे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
तीन दिवसांपूर्वी कोराडीतील तव्वकल सोसायटी येथे वृत्तांकनासाठी गेलेले पत्रकार विनायक पुंड यांच्यावर हल्ला करून पोलिस निरीक्षक कदम यांनी त्यांचा मोबाइल हिसकावून तोडला होता. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत पत्रकार संघाने पोलिस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांना निवेदन दिले होते. कदम यांच्याविरुद्ध दोन दिवसांत कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती.