नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे शनिवारी उद्घाटन

0
12

नागपूर,दि.24 : कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे बांधण्यात आलेल्या नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे शनिवारी (२७ मे रोजी) सकाळी ११ वाजता आसाम व मेघालयचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार आहेत. याशिवाय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल तुमाने, खा. विकास महात्मे, खा. रामदास तडस, खा. अशोक नेते, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अविनाश पांडे, आमदार डॉ. आशिष देशमुख व उद्योगपती सत्यनारायण नुवाल उपस्थित राहतील. कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी मंगळवारी एका पत्रपरिषदेत या केंद्राची सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले, भाऊसाहेब देशमुख यांच्यानंतर शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रचनात्मक काम केले आहे. त्यामुळेच या केंद्राला त्यांचे नाव दिले. येथील २.५ एकर जागेत हे केंद्र होत आहे. यात एकाच वेळी १०२ शेतकरी राहू शकतील. शिवाय सुमारे १२५ शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी सुसज्ज असे सभागृह बांधण्यात आले आहे. या व्यतिरिक्त भोजन कक्ष, प्रशासकीय कक्ष, विचार कक्ष व स्वयंपाकगृह सुद्घा तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण परिसराला गांंधी-आंबेडकर असे नाव देण्यात आले असून, सभागृहाला विठ्ठल वल्लभ, विचार कक्षाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रशासकीय कक्षाला सत्यनारायण नुवाल, भोजन कक्षाला प्रा. राम शेवाळकर व स्वयंपाकगृहाला संत गाडगेबाबा गोपालकाला पाक कक्ष असे नाव देण्यात आले आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना नवनवीन कृषी तंत्रज्ञानासंबंंधी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाणार असल्याचे यावेळी गिरीश गांधी यांनी सांगितले. यावेळी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव सुधाकर कडू, सहसचिव बंडोपंत उमरकर व मार्गदर्शक बाळ कुलकर्णी उपस्थित होते.