ग. दि. कुलथे यांचा इशारा : तीन दिवसांचा राज्यव्यापी संप

0
28

भंडारा,दि.25 : राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास येत्या १२ ते १४ जुलैपर्यंत तीन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्याचा अधिकारी व कर्मचारी संघटनेचा निर्णय झाला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी विश्रामगृह भंडारा आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक लटारे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद रक्षमवार, महिला सहचिटणीस संघमित्रा ढोके, सहचिटणीस किशोर मिश्री कोटकर, जनसंपर्क सचिव माधव झोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ग.दि. कुलथे यांनी शासन स्तरावर प्रलंबित असणाऱ्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरुन ६० वर्ष करणे, पांच दिवसाचा आठवडा, बाल संगोपन रजा, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहण व दमदाटी करणाऱ्यांविरुध्द कठोर कार्यवाहीचा कायदा करणे, प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेली सर्व पदे भरणे आदी मागण्यांचा उहापोह केला.तसेच राज्य शासनाने राजपत्रित अधिकारी महासंघास बांद्रा (पूर्व) येथे १३८१ चौ.मी. आकाराचा भूखंड १ रुपये या नाममात्र दराने उपलब्ध करुन १० कोटी रुपयाचा निधी कल्याण केंद्र बांधकामासाठी दिलेला आहे. या पवित्र संघटनात्मक कार्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले.या बैठकीचे प्रास्ताविक व संचालन कार्याध्यक्ष डॉ. शांतीदास लुंगे यांनी केले. उपस्थितांचे आभार सचिव डॉ. निनाद कोरडे यांनी मानले.

या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर, बी.एम. देवरे, एस.एम. तडस, सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, जि.प. लेखाधिकारी किशोर पवार, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. आर.बी. शहारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. नंदेश्वर, तहसीलदार संजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शहारे, मुख्याधिकारी न.प. अनिल अढागळे, सहाय्यक पुरवठा अधिकारी डी.वाय. देशमुख, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विनोद दाबेराव, पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.बी. गेडाम, डॉ. ए.डी. चिखलीकर, डॉ. गुणवंत भडके, डॉ. युवराज केने, डॉ. प्रशांत वैद्य, डॉ. ए.बी.थूल, डॉ. निखील डोकरीमारे, नायब तहसीलदार ओमप्रकाश काळे आदी विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबतच जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समितीचे प्रभाकर कळंबे, टी.आर.बोरकर, अतुल वर्मा, सतिश मारबते, विनोद राठोड आदी मंडळी उपस्थित होते.