अकोला,दि.17 – गावात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील बोरगाव मंजू येथील तीनशेपेक्षा जास्त महिलांनी लहानमुलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शनिवारी (दि.17) मोर्चा काढला. “विनाकारणचा ताप डोक्याला नको’ अशा भूमिकेत असलेले उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे हे महिलांना पाहून अक्षरशः पळाले. या प्रकाराने संतापलेल्या महिलांनी त्यांच्याच कार्यालयासमोर ठिय्या दिला.तब्बल तीन तास महिला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत होत्या. मात्र त्यांचे निवेदन घेण्यासाठी एकही अधिकारी समोर आला नाही. अधिकाऱ्यांच्या अशा वृत्तीपुढे पोलिसांनीसुद्धा हात टेकले. अखेर महिलांनी सावलीचा सहारा घेत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या दिला.
अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे नियम धाब्यावर बसवत अाबकारी विभागाने दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे. मंदिर, शाळा आणि भरवस्तीत दारूची दुकाने थाटण्यात आल्याने महिला, युवतींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत शनिवारी सकाळी गावातील महिला प्रथमच बोरगाव मंजू पोलिस स्थानकामध्ये तक्रार घेवून गेल्या. त्याठिकाणी ठाणेदाराकडून कोणतेही समाधान न झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या महिलांनी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र जिल्हाधिकारी दौऱ्यावर असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर महिलांचा मोर्चा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या कार्यालयाकडे वळला. मात्र ते देखील कार्यालयात नसल्याने आंदोलनकर्त्या महिला उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांच्या कार्यालयात गेल्या. कार्यालयाबाहेर महिला आल्याचे लक्षात येताच महिलांची नजर चुकवत सुरंजे वाहनात बसून निघाले. जेव्हा महिला निवेदन देण्यासाठी गेल्या तेव्हा उपजिल्हाधिकारी सुरंजे त्यांच्या कक्षात उपस्थित नव्हते.
महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचण्याआधीच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमडेसहित महिला पोलिसांची चमू दाखल झाली होती. महसूल अधिकाऱ्यांनासुद्धा या आंदोलनाबाबत माहित होते. मात्र “नसती झंझट नको’ अशा मानसिकतेतील या कामचुकार अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकून आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्या महिलांनी तीव्र रोष व्यक्त केला.





