कर्जमाफीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा- प्रफुल्ल गुडधे पाटील

0
12

भंडारा,दि.19-संपूर्ण महाराष्ट्रात आत्महत्येचे सत्र सुरु होते. परंतु पूर्व विदर्भात विशेष करून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होते,मागील दोन वर्षात याही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढते आहे. हि फार दुर्दैवी बाब असून महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा होय अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तथा भंडारा जिल्हा प्रभारी प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली केली. पुढे ते म्हणाले कि झालेली कर्जमाफी म्हणजे शुद्ध फसवेगिरी आहे. आज प्रत्येक शेतकरी संभ्रमात आहे कि त्यांचे कर्ज कुठल्या नियमांतर्गत माफ होईल. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यांतर्गत येणाऱ्या जांभोरा या गावातील ताराचंद शेंद्रे यांचे शेतकरी आत्महत्या प्रकरण विशेष बाब म्हणून सरकारने स्विकारावे व शासनातर्फे मदत करावी. मुलगा अंशकालीन प्रथम मजूर असल्यामुळे त्याला नोकरीत सामील करून घ्यावे. शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कोरा करावा अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितिरमारे, महेंद्र निंबार्ते, अमर रगडे, प्यारेलाल वाघमारे, प्रभुजी मोहतुरे, माणिकराव ब्राह्मणकर,अणिक जमा पटेल, प्रशांत देशकर, सचिन घनमारे, सचिन फाले तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

आज दुपारी जांभोरा येथे जाऊन ताराचंद शेंद्रे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस पक्षातर्फे सांत्वना भेट घेतली. कुटुंबियांशी चर्चा करतांना त्यांचा मुलगा म्हणाला कि सततच्या नापिकीमुळे बाबा त्रस्त होते तसेच नातेवाईकांकडून हात उसनवारी घेतलेली पैशाची रक्कम कशी परत करावी या चिंतेत सतत असायचे, म्हणून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल त्यांनी उचलले. गावकरी म्हणाले कि ४५० एकर शेती सातत्याने पडित आहे गेल्या दोन वर्षांपासून पीक होत नाही. नापिकी मुळे गावकरी चिंताजनक स्थितीत आहेत. पीक विम्याची सरकारतर्फे सक्ती करण्यात आली परंतु पिकविम्याचे पैशे किंवा त्याचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी खंत सुद्धा यावेळी गावकर्‍यांनी व्यक्त केली.

भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तथा भंडारा जिल्हा प्रभारी प्रफुल्ल गुडधे पाटील, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर,तुमसर विधानसभा प्रभारी आसावरीताई देवतळे, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, महेंद्र निंबार्ते, अमर रगडे, प्यारेलाल वाघमारे, प्रभुजी मोहतुरे, माणिकराव ब्राह्मणकर,अणिक जमा पटेल, प्रशांत देशकर, सचिन घनमारे, सचिन फाले, सरपंच पवनकर तसेच गावकरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.