बिल्डरची ४० कोटींची प्रॉपर्टी जप्त

0
19

नागपूर,दि.20 : घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणाऱ्या, नागरिकांची फसवणूक करून त्यांना आर्थिक नुकसानासोबत मानसिक त्रास देणाऱ्या झाम बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचा संचालक हेमंत सिकंदर झाम यांच्या ताब्यातील ४० कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने केलेल्या या दणकेबाज कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्या बिल्डर लॉबीत खळबळ निर्माण झाली आहे.

मौजा वागदरा (ता. हिंगणा) येथील खसरा नं. ९४,९७, १०८, १०९ मधील ३० एकरात झाम बिल्डर्स अ‍ॅड डेव्हलपर्सचा संचालक हेमंत सिकंदर झाम यांनी कन्हैया सिटी नावाचा गृहप्रकल्प सुरू करण्याची २०१० मध्ये घोषणा केली होती. येथे सदनिका, बंगलो, रो हाऊसेसचे बुकिंग करणारांना १८ ते ३६ महिन्यात ताबा देण्याचे लेखी आश्वासन झाम बिल्डरकडून दिले जात होते. त्यामुळे सुमारे ४१८ ग्राहकांनी त्याच्याकडे सदनिका, बंगलो, रो हाऊसेसची नोंदणी केली. बिल्डरने सांगितल्याप्रमाणे संबंधितांनी त्याला लाखोंची रक्कमही दिली. मात्र, बिल्डरने ठरल्याप्रमाणे ग्राहकांना १८ महिनेच काय, सात वर्षे होऊनही त्यांच्या स्वप्नातील घराचा ताबा दिला नाही.

श्रीकांत रामचंद्र जनबंधू (वय ४३, रा. समतानगर) यांनीही २ मे २०११ रोजी सदनिका बुक करून झामकडे २ लाख ३९ हजार ८०० रुपये जमा केले. ९ नोव्हेंबर २०११ रोजी बिल्डरने तसे मालकी हक्काबाबतचे अ‍ॅग्रीमेंट टू सेल करून देत १८ महिन्यात सदनिकेचा ताबा देणार असे सांगितले.

त्यानंतर जनबंधू जेव्हा जेव्हा आपल्या स्वप्नातील सदनिका बघायला गेले तेथे त्यांना केवळ कुंपण भिंतच दिसून येत होती. त्यामुळे जनबंधू आणि त्यांच्यासारख्याच अनेकांनी झामच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. बिल्डरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे जनबंधू यांनी १९ आॅक्टोबर २०१५ रोजी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली होती.