२६,८२५ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ

0
10

भंडारा,दि.26 : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत राज्य सरकारने दीड लाख रूपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जिल्ह्यातील २२ हजार ८२५ शेतकऱ्यांना १४५ कोटी ८५ लाख रूपये कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यात १७ हजार ६०० पीक कर्जधारक शेतकरी असून त्यांचे ८८ कोटी ३३ लाख तर ९ हजार १५५ मुदती कर्जधारक शेतकरी असून त्यांचे ५७ कोटी ५२ लाख रूपयांचा या कर्जमाफीत समावेश होणार आहे.

राज्य सरकारने ११ जून रोजी शेतकरी कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिल्याची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा केली परंतु तत्त्वत: असा शब्दप्रयोग केल्यामुळे कर्जमाफी होणार कि नाही? झाली तर कधी होणार? किती मर्यादा किती राहील? असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांसमोर होते.या सर्व बाबींना २४ जून रोजी पूर्णविराम मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून सरसकट दीड लाख रूपयापर्यंत राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींचा कर्जमाफीचा लाभ देऊन ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीने २६ हजार८२५ शेतकऱ्यांना १४५ कोटी ८५ लाख रूपयांची कर्जमाफी होणार आहे.