विकासासाठी सहकार्य आवश्यक-पालकमंत्री डॉ. दीपक सावंत

0
13

भंडारा : शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी डॉ.सावंत म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, सिंचन, रोजगार, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेला राष्ट्रीय प्रकल्प गोसीखुर्द आणि या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला आपले प्राधान्य राहणार आहे. पुनर्वसित गावात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहे व त्याची सद्यस्थिती कशी आहे. याबाबतची माहिती घेवून पुनर्वसन झालेल्या ठिकणी आवश्यक ती दुरूस्ती कामे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी सभेत संबंधित अधिकार्‍यांना दिले.
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत होणार्‍या बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया मुंबई ऐवजी नागपूर येथे निवड केलेल्या रुग्णालयात झाल्या पाहिजे. त्यामुळे बालकांच्या पालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होईल.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी जिल्ह्याची आरोग्य, खनिज, उद्योगधंदे, रोहयो, सिंचन प्रकल्प मत्स्य व्यवसाय, रेशीम विकास, दुग्धविकास, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासह अन्य विषयांची माहिती सादरीकरणातून दिली. सभेला सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी, पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.