जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-बळीराजा संघटना

0
11

गोंदिया,दि.19 :बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावे यासंबधिचे निवेदन उपविभागीय अधिकारीमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवून शेतीचे पंचनामे तत्काळ करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या सूचनेप्रमाणे शेतकºयांनी भातपिकाच्या पेरणीला ७ जूनपासून सुरूवात केली होती. परंतु पाऊस न आल्यामुळे शेतकºयांनी पुन्हा ३० जूनपासून दुबार पेरणी केली. पण गोंदिया जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे भातपिकाची रोवणी केवळ १५ टक्केच झाली.रोवणी करण्याची शेवटची तारिख १५ आॅगस्ट असते. त्यानंतर रोवणी केली तर धानपीक अत्यल्प प्रमाणात होते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.धानाचे पीक पूर्णत: करपले असून आता धानपिकाची रोवणी करता येणार नाही. पालकमंत्री बडोले यांनी १५ आॅगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर जिल्ह्यात दुष्काळ घोषित करू, अशी घोषणा केली होती. परंतु या संदर्भात आतापर्यंत शासनाने काहीही घोषणा केली नाही.
पाऊस अत्यल्प पडल्यामुळे शेती व पिण्यासाठी पाण्याची मोठी टंचाई आतापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा अन्यथा सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघातर्फे देण्यात आला आहे.निवेदन देताना संघाचे अध्यक्ष संजयसिंह टेंभरे, चुटियाचे सरपंच चंद्रकला तुरकर, उपसरपंच रामू शरणागत, माजी सरपंच रतनलाल बघेले, कुंडलीक तुरकर, डोमाजी टेंभरे, दुलीचंद कटरे, कुवरलाल शरणागत, मुन्नालाल तुरकर, दुर्गाप्रसाद कुरंजेकर, समलीक तुरकर, धनलाल गौतम, अशोक टेंभरे, जीवनलाल पटले, देवनाथ येलसरे, मुन्नालाल गौतम, हरिलाल गराकाटे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.