नागभीडपर्यंत धावली विजेवर गोंदिया-बल्लारशा रेल्वेगाडी

0
23

गोंदिया,दि.26 : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळाच्यावतीने गोंदिया व नागभीड सेक्शनमध्ये विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने गोंदिया ते नागभीड दरम्यान गोंदिया-बल्लारशाह-गोंदिया ही पॅसेंजर गाडी 25 आॅगस्टरोजी विजेवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकानुसार दिली होती. त्यानुसार शुक्रवारी गोंदिया-बल्लारशाह-गोंदिया ही प्रवासी गाडी गोंदिया स्थानकावरुन सकाळी 7 वाजता विजेवर चालविण्यात आली.
गोंदिया ते नागभीडपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे शुक्रवारी प्रथमच सोडण्यात आलेल्या गाडीचा प्रवास या मार्गावरील प्रवाशासांठी थोडा  वेगळाच होता,.गाडी जेव्हा प्रत्येक स्थानकावर पोहोचत होती, तेव्हा प्रत्येक प्रवासी व नागरिक वेगळ्याच नजरेने तिला बघत होते.मात्र गाडी विजेवर धावली असली तरी वेळेचे बंधन पाळून लवकर पोचण्यात मदत होईल का याबद्दल अजूनही काही प्रवाशांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे स्थानकादरम्यान धावत असलेल्या गोंदिया-बल्लारशाह-गोंदिया प्रवासी गाडीच्या वेळापत्रकात विद्युतीकरणामुळे गोंदिया व नागभीडदरम्यान २५ आॅगस्ट पासून परिवर्तन करण्यात आले आहे. मात्र नागभीड ते बल्लारशाह रेल्वे स्थानकांच्या दरम्यान वेळापत्रकात कसलाही बदल होणार नसल्याचे रेल्वेने कळविले आहे.नागभिड येथे गाडीला 20 मिनिटाचा थांबा देण्यात आला आहे. गोंदिया ते नागभीडदरम्यान गणखैरा, हिरडामाली, पिंडकेपार, गोंगले, खोडशिवनी, सौंदड, गोंडउमरी, देवलगाव, बाराभाटी, अर्जुनी, वडेगाव, अरूणनगर, वडसा, चिचोली बु.,ब्रह्मपुरी व किरमिटी मेंढा या स्थानकांचा समावेश आहे. गोंदिया-बल्लारशाह (५८८०२) गाडी गोंदियातून सकाळी ७ वाजता सुटून व सदर स्थानकांवरून नागभीडला सकाळी १०.०१ वाजता पोहोचली. तर बल्लारशाह-गोंदिया (५८८०१) गाडी नागभीडवरून सायंकाळी ४.५२ वाजता सुटेल व रात्री ८.३० वाजता गोंदियाला पोहोचेल, असे रेल्वेने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.