सटवा येथे डांबरीकरण रस्त्यावरच कंत्राटदाराने घोटला सिमेंट रस्ता

0
30

गोरेगाव,दि.13: जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंदिया अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे २५१५ या लेखा शिर्षातील सिमेट रस्ता बांधकामाचे काम करतांना कंत्राटदाराने  जुन्या डांबरीकरण रस्त्याचे खोदकाम न करताच सिमेंटीकरण रस्ता केल्याची तक्रार नागरिकांनी अभियंत्याकडे केली.मात्र सदर प्रकरणात सहभागी असलेल्या अभियंत्याने सुध्दा काम व्यवस्थित असल्याचा दाखला देत सारवासारव केल्याने कंत्राटदारासह अभियंत्याची सुध्दा सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर रस्ता ५ लक्ष रुपये किमंतीचा असून रस्ता बांधकाम करताना आधीचा जुना रस्ता खोदकाम करुन नव्याने सिमेंट रस्ता तयार करायला हवा होता. परंतु कंत्राटदाराने तसेच न करताच काम केल्याने सदर रस्ता कधीही फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच कामाची गुणवत्ता सुद्धा नसल्याचे लोकांचे म्हणने आहे. रस्त्याचे सिमेंटीकरण सुरु असताना संबंधित शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता एकही दिवस कामाची पाहणी करण्याकरिता गावात आले नसल्याची माहिती  सामाजिक कार्यकर्ते रहांगडाले यांनी दिली आहे. अभियत्याला काम बरोबर नसल्याचे सांगितल्यावर त्या अभियंत्याने मात्र काम बरोबर असल्याचे सांगून वेळ मारुन नेली. त्यामुळे कार्यकारी अभियंत्याने सटवा येथील कामाची प्रत्यक्ष पाहणी तसेच गुणवत्ता तपासावी अशी मागणी करण्यात आली आहे.