गोंदिया शहरात कोट्यवधींच्या काळापैशावरून भीतीचे वातावरण

0
11
गोंदिया,दि.13- व्यापारी नगरी म्हणून पूर्व विदर्भात ओळख असलेल्या गोंदिया शहरात सद्यःस्थितीत काळ्या पैशाच्या वसुलीची चर्चा जोरात सुरू आहे. व्यापाऱ्यांना व्याजावर दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशाच्या वसुलीसाठी व्यापाऱ्यांना धमकावणे सुरू असून यामध्ये काही पोलिस कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याची खमंग चर्चा शहरात आहे. ही परिस्थिती पुढे स्फोटक होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत असून सरकार व प्रशासन हे प्रकरण कसे हाताळते, याकडे गोंदियाकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान,नोटाबंदीमुळे हा पैसा त्या दबंग सावकारांनी गुंडगिरीच्या माध्यमातून वसूल करण्याचा मार्ग पत्करल्याचे नागरिक बोलत आहेत.
अवैध सावकारीच्या पैशाला घेऊन गोंदिया शहरात सध्या मारहाणीचे प्रकारच नव्हे तर ज्यांच्याकडे पैसा आहे.त्यांची मालमत्ता पडक्या दरात खरेदी करुन लुबाडणूक करण्याचा ही प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे.त्यातच  गोंदियात गेल्या काही वर्षापासून परराज्यातील तुरुंगात असलेल्या एका तथाकथीत व्यक्तीच्या काळ्या कमाईचा पैसा व्याजाने दिला जात होता. तोच पैसा वसूल करण्यासाठी सध्या मारहाणीचा व गुंडगिरीचा प्रकार शहरामध्ये होत असून अधिकृतरित्या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे होत नसल्याने पोलिसांचे हात बांधले गेले आहे. असे असतानाच गोंदियातील ४० ते ५० लोकांनी आपला उधार दिलेला ५० ते ६० कोटी रुपये परत मिळत नसल्याचे लेखी पत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात दिल्याच्या चर्चेने चांगली खळबळ उडाली आहे.ज्या लोकांनी हे पत्र दिले असेल त्या लोकांचा तो पैसा एक नंबरचा की दोन नंबरचा अशा चर्चा सुरु  झाल्याने आयकर विभागाचीही झोपमोड झाली आहे. त्यामुळे  हे प्रकरण शासन-प्रशासन कशा पद्धतीने हाताळण्यासाठी पाऊल उलचते याकडे ही अनेकांचे लक्ष लागले आहे. चर्चेनुसार त्या लेखी पत्रावर स्वाक्षरी करणार्यामध्ये नागपूरातील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीचाही समावेश असल्याची चर्चा आहे
गोंदिया शहराची व्यापारासंदर्भात राज्यात चांगली ओळख आहे. या शहरात ‘ब्लॅकमनी सर्क्यूलेशन’चा धंदा फारपूर्वी पासून जोरात सुरू आहे. याकडे प्रशासन व प्राप्तिकर विभाग नेहमीच डोळेझाक करीत आला आहे. हा काळापैसा एका विशिष्ट समाजातील काही गब्बर गरजू व्यापारी व आपल्याच समाजातील काही गरजवंतांना विशिष्ट व्याज आकारून देत असतात. त्याचे हप्ते कर्ज घेणारे व्यापारी हे टप्प्या टप्प्याटप्याने सावकारांना परत करीत असतात. तर हप्ते नियमित न देणाऱ्या कर्जदारांकडून ‘मसलपॉवर’चा वापर करून सुद्धा कर्जाची वसुली सक्तीने केली जात असल्याचे प्रकार नेहमीचेच आहेत. हा व्यवहार कोट्यवधींच्या घरात असून यातून गुन्हेगारी विश्वात सुद्धा वाढ झाली आहे.
या प्रकारामुळे कर्जदार व त्यांचे कुटुंबीय चांगलेच दहशतीत वावरत आहेत. या प्रकाराला घाबरून अनेक व्यापाऱ्यांंनी गोंदिया शहरातून पलायन केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. या अवैध काळ्यापैशाच्या वसुलीसाठी सावकार काही पोलिस कर्मचाèयांचा सुद्धा वापर करीत असल्याचे बोलले जात आहे. कर्जाच्या वसूलीपोटी कर्जदाराचे घर रिकामे करणे, त्यांच्या भूखंडाचा ताबा घेणे, कर्जदारांच्या घरी वा दुकानात जाऊन मोठ्याने ओरडून त्यांची बेआब्रू करणे इत्यादी प्रकार सर्रास सुरू आहेत. हा सर्व व्यवहार कोणतेही लेखी करार न करता गेल्या कित्येक वर्षापासून शहरात सर्रास सुरू आहे. या प्रकारातून अनेक मोठे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आजवर मलई खात आले आहेत. सरकारने या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर शहरात मोठे अनुचित प्रकार कधीही घडू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.