एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू

0
17

मुंबई,दि.29 – मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण  33 जण जखमी झाले आहेत. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. एलफिन्स्टन दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशीचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून आदेश दिले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे. आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे.  पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. तर एका व्यक्तिच्या सांगण्यानुसार प्रचंड गर्दीच्यावेळी एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली.शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जखमींना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  शिवाय, घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही ते म्हणालेत.