गुमाधावडा येथे स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ

0
14

गोंदिया,दि.२९ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत गुमाधावडा येथे स्थापन करण्यात आलेल्या आधार व विकास ग्रामसंस्थेच्या सहकार्याने ‘स्वच्छता ही सेवाङ्क या अभियानाचा शुभारंभ २८ सप्टेबर रोजी तिरोडा तालुक्यातील गुमाधावडात उत्साहात करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटविकास अधिकारी श्री.ईनामदार, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, गावच्या सरपंच साधना बंसोड, माविमच्या तालुका कार्यक्रम समन्वयक शिल्पा येळे, प्रभाग समन्वयक विनोद राऊत, सचिव डी.बी.सहारे यांची उपस्थिती होती.
श्री.ईनामदार यांनी स्वच्छता आणि शौचालयाची गरज व महत्व पटवून दिले. गावातील बचतगटातील महिला, ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी यांनी गावामध्ये प्रभातफेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. ज्या घरी शौचालय नाही अशा कुटूंबांना भेटी देण्यात आल्या. श्रमदानातून शौच खड्डे तयार करण्यात आले. ज्या घरी शौचालय नाही आणि ज्या घरी शौचालय आहे अशा दोन्ही घरी भेटी देवून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. शौचालय असून सुध्दा वापर न करणाऱ्या कुटूंबांकडून त्याबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. शौचालयाच्या वापराचे महत्व पटवून देण्यात आले. ग्रामसंस्थेच्या माध्यमातून शौचालय बांधण्यासाठी आर्थिक अडचण असलेल्या कुटूंबांना मदत करता येईल असेही मार्कंड यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोगीनी नलिनी मेहर, अनिता आदमने, छाया पटले, कमल पटले, कामेश्वरी पटले, तामेश्वरी पटले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन विनोद राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार नंदेश्वरी बिसेन यांनी मानले.