जळण्यापूर्वीच रावणाने केले तिघांना घायाळ

0
19

देसाईगंज,दि.30 : दसऱ्याच्या दिवशी दहनासाठी तयार केलेल्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तोंड लावताना लोखंडी खांब तुटल्याने तिघेजण खाली कोसळून गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारला आदर्श विद्यालयाच्या पटांगणावर घडली.दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी देसाईगंज येथे रावण दहन केले जाते. ३० सप्टेंबरला दसरा असल्याने रावणाचा प्रतिकात्मक पुतळा बनविण्याचे काम आदर्श विद्यालयाच्या पटांगणावर सुरु होते.शुक्रवारला दुपारी तीन कारागिर खांबावर चढून रावणाला तोंड लावण्याचे काम करीत असताना पुतळ्याचा आधार असलेला लोखंडी खांब अचानक खाली कोसळला. यामुळे तिघेही जण खाली कोसळून जखमी झाले. यातील एकाचा हात व दुसऱ्याचा पाय तुटला असून, तिसऱ्या कारागिराच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिघांनाही शहरातील टुटेजा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर नागपूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान दहनापूर्वीच रावणाने तिघांना घायाळ केल्याने यंदा शहरात रावण दहन होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार कृष्णा गजबे, भाजप नेते मोती कुकरेजा व अन्य कार्यकर्त्यांनी टुटेजा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.