विषमुक्त अन्नासाठी सेंद्रीय शेतीची कास धरा- अभिमन्यू काळे

0
32

गोंदिया, दि.११ : कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शेतातील उत्पादित मालातून दररोजच्या आहारात काही प्रमाणात विष खाण्यात येत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांचे धोके ओळखून शेतकऱ्यांनी आता विषमुक्त अन्नासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
अलिकडेच यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकाचा शेतात वापर करतांना झालेल्या विषबाधेतून काही शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचे अध्यक्षतेखाली कृषि विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कृषि केंद्र संघाच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एम.चौरागडे, कृषि उपसंचालक अश्विनी भोपळे, उपविभागीय कृषि अधिकारी नंदकिशोर नायनवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात कमीत कमी किटकनाशक व रासायनिक खताचा वापर होईल तसेच फवारणीबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबतचा प्रचार-प्रसार कृषि सहायकांनी करावा. माय पोर्टलवरुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना किटकनाशकांच्या वापराबाबत मोबाईलवर संदेश पाठवावे. आज किटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला आहे हे यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरुन लक्षात येते. किटकनाशकांच्या अतिवापरामुळे मित्रकिडीचा मोठ्या प्रमाणात नायनाट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात भात पीक हे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, भात पिकावर खोडकीडा, गादमाशी, तुडतुडे, करपा यासारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शिफारशीपेक्षा अत्यंत जास्त प्रमाणात किटकनाशकांची फवारणी केली जाते. तसेच निष्काळजीपणे किटकनाशकांची हाताळणी केल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात. कीड रोगावर नियंत्रण मिळविण्याकरीता अनेक जैविक किटकनाशके, मित्रकीड संशोधित झालेल्या असून त्यांचा योग्य त्या वेळी वापर केल्यास अत्यंत कमी खर्चात कीड रोगावर नियंत्रण मिळवता येईल तसेच जमिनीचे आरोग्य, पिकांची गुणवत्ता व शेतकऱ्यांचे आरोग्यसुध्दा सुदृढ ठेवता येईल असे ते म्हणाले.
भात पिकाकरीता विविध कीड रोग नियंत्रणाकरीता रासायनिक किटकनाशकाऐवजी ट्रायकोग्रामा जॅपोनिकम (खोडकीडाकरीता), मेटाऱ्हायसिअन ॲनिसोएमी (तुडतुड्याकरीता), कामगंध सापळे इत्यादीसारख्या जैविक नियंत्रकाचा वापर करावा. याशिवाय बेडूक संवर्धन केल्यास भातशेतीमध्ये खोडकीडा नियंत्रणाकरीता अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्याचे संवर्धन देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.काळे यांनी शेतकऱ्यांना यावेळी केले. यावेळी कृषि केंद्र संघटनेचे नितीन गुप्ता, अशोक गुप्ता, महेश पाचे, श्रीराम चंदानी, रामअवतार अग्रवाल, शैलेश जैन व राहूल सिंघानीया यावेळी उपस्थित होते.