पुणे-काझीपेठदरम्यान आजपासून सुपरफास्ट रेल्वे

0
11

चंद्रपूर,दि.20- मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने पुणे ते काझीपेठ व्हाया चंद्रपूर ही नवी साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन (22151) करण्यात आली आहे. उद्यापासून प्रत्येक शुक्रवारी रात्री 9.45 मिनिटांनी ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी ती काझीपेठ येथे गाडी पोचेल. या गाडीच्या थांब्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुढाकार घेतला होता.

यापूर्वी पुण्यातून काझीपेठला जाण्यासाठी कोणतीही गाडी नव्हती. पुणे-नागपूर या रेल्वेने नागपूर येथे जावे लागत होते. तेथून दुसरी रेल्वे अथवा बस पकडून वर्धा-काझीपेठला जावे लागत असे. त्यामुळे प्रवाशांना खर्च आणि वेळ अधिक लागत असे. ही गाडी सुरू झाल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पुण्यावरून निघाल्यानंतर ही गाडी शनिवारी सकाळी 10.22 मिनिटांनी वडनेरा, चंद्रपूर येथे दुपारी एक वाजून 37 मिनिटे आणि दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी बल्लारशाह येथे पोचेल. ही गाडी (22152) काझीपेठ येथून रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निघेल. ती सोमवारी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी पुण्यात पोचेल. ही साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन दोन्हीकडे पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, वडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशाह, शिरपूर, रामगुंडम, पेठापल्ली आणि काझीपेठ असे थांबे घेत जाणार आहे. या गाडीसाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासूनची ही मागणी पूर्ण झाली आहे; परंतु ती साप्ताहिक असून, ही गाडी दररोज मार्गावर धावणे गरजेचे आहे, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली. या गाडीला जळगाव आणि चाळीसगाव येथेदेखील थांबा देणे आवश्‍यक आहे, असेही त्या म्हणाल्या.