आलापल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आविसं-भाजप युतीच्या सुगंधा मडावी यांची अविरोध निवड

0
17

गडचिरोली, दि.१: जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आदिवासी विद्यार्थी संघ व भाजप युतीच्या सुगंधा मडावी यांची अविरोध निवड झाली. मात्र, या युतीशी भाजपचा काहीही संबंध नसून, भाजपच्या स्थानिक सदस्यांनी ही युती केल्याची स्पष्टोक्ती भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र नेलकुद्री यांनी दिल्याने भाजपमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

१७ सदस्य असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ सदस्य निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच रेणुका कुळमेथे यांनी तीन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने काल(दि.३१) निवडणूक घेण्यात आली. यात आदिवासी विद्यार्थी संघाने भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांशी युती करुन निवडणूक जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगले. या युतीतर्फे सुगंधा मडावी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची अविरोध निवड झाली. १३ सदस्य असतानाही आविसंच्या सुगंधा मडावी यांना सहकार्य करण्याची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली.

माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष तोडसाम, भाजपचे नेते व ग्रामपंचायत सदस्य विनोद अकनपल्लीवार, सुभाष घुटे, रवींद्र मुप्पीडवार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली. सरपंचपदासाठी संतोष तोडसाम, विनोद अकनपल्लीवार, रवी मुप्पीडवार, शकुंतला दुर्गम, अल्का सोनुले, सलीम शेख, संगीता तावाडे, चंद्रकला तलांडे यांनी सहकार्य केले.

या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, उपसभापती राकेश तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अनिता आत्राम, जिल्हा परिषद सदस्य अजय, माजी सरपंच कुसनाके, दिलीप गंजीवार,ग्रामपंचायत सदस्य संतोष तोडसाम, भाजपचे नेते व ग्रामपंचायत सदस्य विनोद अकनपल्लीवार, सुभाष घुटे, रवींद्र मुप्पीडवार आदींनी जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला.