काँग्रेसमध्येच ‘आक्रोश’ चंद्रपुरात आमने-सामने

0
10

चंद्रपूर,दि.01 : काँग्रेसमधील गटबाजीचे लोण विदर्भात पसरत चालले आहे. आता एकाच शहरात एकाचवेळी दोन वेगवेगळे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. प्रदेश काँग्रेसने राज्य सरकार विरुद्ध संघर्षांचा बिगुल फुंकत ६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर येथे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘विभागीय जनआक्रोश मेळावा’ आयोजित केला आहे तर तेथेच त्याच दिवशी, त्याच वेळी माजी खा. नरेश पुगलिया यांनी बाजूच्याच मैैदानावर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या बॅनरखाली शेतकरी व कामगार रॅली आयोजित केली आहे. त्यात विदर्भातील ‘निष्ठावान’ असंतुष्ट नेत्यांना निमंत्रित केले आहे. आमने-सामने होत असलेल्या या दोन मेळाव्यांमुळे काँग्रेसमधील ‘आक्रोश’ प्रखरतेने चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.
विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी नागपुरात येत चंद्रपूरच्या मेळाव्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेच सोमवारी पुगलिया यांनी पत्रकार परिषद घेत शेतकरी व कामगार रॅली घेत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर पुगलिया यांनी मंगळवारी नागपुरात येत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी नितीन राऊत, अनिस अहमद, माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आदींची भेट घेत या रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या वेळी या सर्व नेत्यांची सिव्हील लाईन्समधील चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर बैठक झाली. बैठकीनंतर पुगलिया यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरातील संबंधित नेते मेळाव्याला येणार असून शिवाजीराव मोघे, वसंत पुरके हे देखील समर्थकांसह उपस्थित राहणार असल्याचा दावा केला. माजी खा. गेव्ह आवारी यांनी नागपुरातील संबंधित नेत्यांसह तीन हजार कार्यकर्ते चंद्रूपरच्या रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे या सर्व नेत्यांनी यापूर्वीच प्रदेश काँग्रेसवर अविश्वास दाखवित ‘विदर्भ काँग्रेस’ स्थापन करण्याची मागणी हायकमांडकडे केली आहे.