गडचिरोली,दि.16ः- महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसुचित जाती कल्याण समितीने आज १६ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे दाखल होत जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाजाला सुरवात करीत अनुसूचित जातींच्या योजनांचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे.आमदार हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गडचिरोली दौºयावर आली असून सकाळपासून समितीने विविध विभागाचा आढावा घेतला.
या समिती सदस्यामध्ये आमदार जोगेंद्र कवाडे, डॉ. मिलींद माने, धनाजी अहीर, प्रकाश गजभिये, लखन मलीक, राजू तोडसाम, ज्ञानराज चौगुले, आ. ब. रहाटे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आ. हरिष पिंपळे यांचे पुष्पगुच्छ स्वागत केले तर मुख्य वनसंरक्षक एटबॉन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समितीतील सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सर्व विभागातील अनुसुचित जातीच्या प्रवर्गातील अधिकारी/ कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात आज समितीने आढावा घेतला. ही समिती जिल्ह्यात तीन दिवस दौºयावर आली असून उद्या शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील मागासवर्गीय उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानीतशाळा/ वसतीगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना भेटी देऊन संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा करणार आहे. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ११.०० ते २.०० वाजेपर्यंत सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन सविस्तर अहवाल विधानमंडळात समिती सादर करेल.





