28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ आंबेनाला निमगाव लघु प्रकल्पासाठी आ.रहागंडाले भेटले गडकरींना

आंबेनाला निमगाव लघु प्रकल्पासाठी आ.रहागंडाले भेटले गडकरींना

0
28

तिरोडा,दि.18 : तिरोडा तालुक्यातील १९७३ पासून रखडलेला आंबेनाला निमगाव लघु प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर अंतिम मान्यतेकरिता केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच मान्यता मिळणार असून येत्या दोन वर्षात प्रकल्प पूर्ण होईल, अशी ग्वाही आमदार विजय रहांगडाले यांनी दिली आहे.तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार रहांगडाले यांनी १५ नोव्हेंबरला केंद्रीय रस्ते वाहतुक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून निमगाव प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळवून द्यावी, या संबंधी पत्र दिले.त्यात सदर प्रकल्प १९७३ पासून प्रलंबित असून  या प्रकल्पापासून ११७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दोन्ही तिरावरील मातीकाम ८० टक्के, पुरक कालव्यांचे काम, सांडवा पूर्ण व आगमन-निर्गमन नालीचे प्रत्येकी ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. याकरिता त्वरित मंजुरी मिळवून देण्याची मागणी या वेळी केली.
आंबेनाला निमगाव प्रकल्पाला ९ जुलै १९७३ नुसार २३.७० लाख रुपयास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. ३ डिसेंबर १९८० ला ५१.३१७ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. १२ मे २००८ ला १८७६.४१ लाख रुपयांची द्वितीय प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यानंतर वनविभागाच्या कचाट्यात अडकल्याने हे प्रकल्प ४४ वर्षांपासून रखडलेले आहे.विद्यमान आमदार रहांगडाले यांच्या गावाशेजारी असल्याने आणि शेतकऱ्यांची मागणी व समस्या लक्ष घेत, त्यांनी सदर प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.
उपवन संरक्षक, गोंदिया वनविभाग यांच्या २२ जुलै २०१५ च्या पत्रान्वये सुधारित दरानुसार १० कोटी ४४ लाख ८५ हजार ३१५ रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. एकूण २३६२.९० लाख रुपयांपैकी १३१८.०४ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष बदलल्याने २७ जुलै २०१५ च्या पत्रान्वये १३.०१ कोटींचा निधी मागणीचा प्रस्ताव देण्यात आला. २५ एप्रिल २०१६ च्या पत्रानुसार माहिती मागविण्यात आली.उर्वरित १४ कोटी २६ लाख ८६ हजारांच्या निधीस १९ सप्टेंबर २०१७ च्या बैठक क्र. १४७ मध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. या अनुषंगाने पत्रानुसार (३४२९/प्रशा-२/निमगाव २०१७, दिनांक १२ आॅक्टोबर २०१७) प्रकल्पाकरिता वनजमिनीच्या अद्ययावत सुधारित निधीची मागणी सादर करण्याबाबत उपवनसंरक्षक गोंदिया यांना कळविण्यात आले आहे. मात्र आत्तापर्यंत कोणतेही मागणी पत्र शासनाला उपलब्ध करुन दिले नाही.