चार दिवस लोटूनही सालेकसा नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्जाची वाणवा

0
7

सालेकसा,दि.24 :सालेकसा नगर पंचायतच्या प्रथम निवडणुकीचा बिगुल वाजला असून १८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु गेल्या चार दिवसांत एकही अर्ज दाखल न झाल्याने उमेदवार निवडीत सर्वच पक्षांची चांगलीच तारांबळ होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवार विविध पक्षांच्या संर्पकात आहेत.त्यातच आमगावखुर्दचा समावेश न झाल्याने त्याचा सुध्दा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सालेकसा नगर पंचायतमध्ये एकूण १७ नगरसेवक, त्यासोबतच थेट मतदारांच्या माध्यमातून नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे. येत्या १३ डिसेंबर रोजी होणाºया मतदान कार्यक्रमात आपल्या पक्षाच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदावर आरुढ होण्याची प्रथम संधी लाभावी, यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे चारही पक्ष दमदार उमेदवार शोधत आहेत.
विशेष म्हणजे नगराध्यक्षपद अनुुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने एकीकडे सर्वसामान्य वर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे काही दिग्गज कार्यकर्ते या निवडणुकीला विशेष महत्व देत नसले तरी अनुसूचित जमातीचे कार्यकर्ते आपल्यासाठी सुवर्ण संधी मानून उमेदवारीसाठी आपला फिल्डींग लावीत आहे. एकूण १७ प्रभागामध्ये १७ नगरसेवक निवडून येतील. त्यात जाहीर केलेल्या सुधारित आरक्षणा प्रमाणे प्रभाग क्रमांक १, २, ६ आणि १५ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. प्रभाग क्रमांक ३, ७, ९ व १६ हे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
अनुसूचित जातीसाठी एकच जागा राखीव आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनुसूचित जातीची महिला नगरसेवक बनणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) पाच पद राखीव आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ४, १२ व १७ हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग क्रमांक ११ व १३ ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ५, १० व १४ हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असून प्रभाग १४ महिला सर्वसाधारणसाठी राहणार आहे. अशा एकूण १७ नगरसेवकांपैकी आठ अनुसूचित जमातीसाठी, एक अनुसूचित जातीसाठी, पाच ओबीसीसाठी आणि तीन पद खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आहेत.
सालेकसा नगर पंचायत ही वास्तविक तालुका मुख्यालयातील भागाच्या बाहेर आहे. या नगर पंचायतीत शहरीकरणाचा भाग कमी असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश आहे. यात बाकलसर्रा, जांभळू, जुना, सालेकसा, मुरुमटोला व हलबीटोला या गावांचा समावेश आहे. यात बाकलसर्रा या गावात दोन प्रभाग, जांभळी गावात तीन प्रभाग, सालेकसात दोन प्रभाग, मुरुमटोला तीन प्रभाग आणि हलबीटोल्यात एकूण सात प्रभाग तयार करण्यात आले आहेत.
या पाच गावांतील १७ प्रभागातील एकूण मतदारांची संख्या दोन हजार ७१५ आहे. यात एक हजार ३७२ पुरुष आणि एक हजार ३४३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदारांची प्रभागनिहाय विभागनी केल्यावर प्रत्येक प्रभागात किमान १३५ ते कमाल १७९ एवढीच मतदार संख्या आहे.
नगर पंचायत निवडणूक कार्यक्रम
१४ नोव्हेंबरला जिल्हाधिकाºयांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १८ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी वेबसाईट सुरु करण्यात आली. २४ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र रविवार सोडून दररोज सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत भरण्यात येतील. २५ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाणनी यादी प्रसिध्द होईल. ३० नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. १३ डिसेंबरला मतदान कार्यक्रम घेण्यात येणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची वेळ सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहील. तर मतमोजणीची वेळ सकाळी १० वाजेपासून करण्यात येईल.