अतिक्रमण हटाव मोहिमेचा बुलडोजर चालला

0
7
चोख बंदोबस्तात मोहिमेला सुरुवात
गोंदिया ,दि.२४: शहर विकासासाठी आडकाठी ठरलेल्या अतिक्रमणाचा तिढा आता मार्गी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वारंवार खंडित होणारी अतिक्रमण हटाव मोहीम जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार आज (ता.२४) पासून सुरू करण्यात आली. यापूर्वी जेव्हा-जेव्हा अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली, त्या-त्यावेळी मोहिमेला गालबोट लागले. अखेर पालिका व जिल्हा प्रशासनाचा निर्देशानुसार पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आज अतिक्रमणधारकांवर बुलडोजर चालला. या कारवाईने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, प्रशासकीय अधिकारी राणे व त्यांचे सहकारी तसेच ग्रामीणचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, रामनगरचे ठाणेदार संजय देशमुख आदींच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहिमेचा शुभारंभ झाला. या मोहिमेचा अनेक नागरिकांनी स्वागत केला असला, तरी या कारवाईने अनेक असंतुष्ट असल्याचेही दिसून आले. विशेष म्हणजे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु असताना शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार  कुठेच दिसून न आल्याने ते कुठेतरी शहरातील सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यात कमी पडले असावे म्हणूनच ग्रामीण व रामनगरच्या ठाणेदारांनी ही मोहीम सांभाळण्यात प्रशासनाला सहकार्य केले यात शंकाच राहीली नाही.ही मोहीम किती यशस्वी व ईमानइतबारे राबविण्यात येते त्याकडे लक्ष लागले आहे.
मागील दिड दशकापासून शहरातील विकास प्रक्रिया ठप्प पडली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांसह विविध कामे अतिक्रमणामुळे रखडल्याचे कारण पुढे आले आहे. अशातच शहरातील अतिक्रमण काढण्यात यावे, यासाठी पालिकेने अनेकवेळा पुढाकारही घेतला. परंतु, व्यापारी व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या  विरोधामुळे ही मोहीम रखडत गेली. त्यातच काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने चांदणी चौक परिसरातून अतिक्रमण हटाव मोहिमला सुरुवात केली. परंतु, या मोहिमेला गालबोट लागून व्यापारी व पोलिसांत झालेल्या मारहाणीमुळे ही मोहीम चांगलीच गाजली. परिणामी, या मोहिमेलाच ‘ब्रेक’ लागला. यानंतर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकार्‍याशी चर्चा करून अतिक्रमण हटाव मोहिमेचे निर्देश दिले. तसेच दिवाळीनंतर कोणत्याही परिस्थितीत ही मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी दिली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनासोबत चर्चा करून शहरातील अतिक्रमण भागाची आखणी प्रक्रिया सुरू केली. त्यानुरुप मार्विंâग प्रक्रियाही राबविण्यात येत आहे.
एकंदरीत स्वच्छ व सुंदर शहर संकल्पनेला मूर्तरुप देण्यासाठी ही मोहीम कारगर ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाला झाला असून, त्यानुषंगाने या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आज स्थानिक सिंधी कॉलनी परिसरातून मुर्री जाणार्‍या मार्गावरील अतिक्रमणधारकांवर बुलडोजर चालवून अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी व्यापार्‍यांनीही या मोहिमेला प्रतिसाद दिला असला, तरी काही व्यापार्‍यांनी नोटीस कमी वेळात दिल्याची खंतही यावेळी व्यक्त केली. एकंदरीत ही मोहिम आता अविरत सुरू ठेवून शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढावे, अशी मागणीही आज अतिक्रमण काढतेवेळी समोर आली.