नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहात ग्रामीण भागातील बससेवा बंद

0
10

गडचिरोली,दि. 4 -नक्षल्यांनी २ ते ९ डिसेंबरपर्यंत पीएलजीए सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्ताने धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील संपूर्ण बससेवा व खाजगी वाहतूक बंद आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गडचिरोली आगारातून धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील धावणार्‍या बसफेर्‍या ह्या धानोरापर्यंत सुरू आहेत. यामध्ये गडचिरोली – गोडलवाही बस, गडचिरोली – खांबाडा बस धानोरापर्यंत तर गडचिरोली – कोटगुल बसफेरी ही मुरूमगावपर्यंंतच सुरू आहे. गडचिरोली – मानपूर बस धानोरापर्यंत सुरू आहे. खांबाडा मार्गावर बससेवा, खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. तसेच गडचिरोली – कारवाफा-पेंढरीपर्यंंत बसफेरी सुरू असून पेंढरीच्या पुढे ग्रामीण भागातील बसफेर्‍या बंद आहेत. घोटपर्यंंत बसेस सुरू असल्या तरी घोटच्या नंतर जाणार्‍या ग्रामीण भागातील बसफेर्‍या बंद आहेत. यामुळे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना ये-जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत असून एसटी महामंडळालाही लाखो रूपयांचा फटका असत आहेत.