रेल्वे भुयारी मार्गाचे बांधकाम बंद करण्याची मागणी

0
8

गोरेगाव,दि.09ः- गोंदिया ते चंद्रपूर या रेल्वे मार्गावरील गणखैरा रेल्वे फलाटाजवळ रेल्वे भुयरी मार्गाचे बांधकामासंबंधी कोणत्याही प्रकारचा नाहरकत प्रमाणपत्र व ठराव प्रत दिला नसतानाही ग्रामपंचायत व गावकर्‍यांची दिशाभूल करून भुयारी मार्गाचे काम करीत आहेत. तेव्हा हा बांधकाम बंद करण्याची मागणी पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधू, सरपंच व गावकर्‍यांनी मुख्य रेल्वे प्रबंधकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
गणखैरा एल.सी.नं.८ वरून मिलटोली गोंदिया – कोहमारा राज्य महामार्गावर जाण्यासाठी रस्ता आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी तोच रस्ता आहे. मात्र, रेल्वे विभागाकडून बनत असलेला भुयारी मार्ग यु आकाराचा असून एल.सी. नं. ८ पासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर बनत असल्यामुळे रात्रीला कामावर जाणारे-येणारे नागरिकांचा जीव व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भूयारी मागार्संबंधी दस्तावेज व मंजूर झालेले रेखांकन (नकाशा) ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्यावा. आधीच खोल असलेल्या भुयारी मार्ग १६ ते १८ फूट खोल खोदून यु आकाराचे तयार होत आहे.
दळणवळण वाहने वळविताना अपघात टाळता येत नाही व विरूद्ध दिशेने येणारे वाहनचालकांना रस्ता दिसत नाही. एल.सी. नं.८ वरून शेतकरी शेतात जाणे-येणे करतात, पावसाळ््यात या भुयारी मार्गावर पाणी साचले जाणार असल्याने शेतकर्‍यांना ३ ते ४ महिने जाणे-येणे करता येणार नाही. गावात व परिसरातील गावात संकटकालीन आग लागल्यास अग्निशमन गाडी गावात आणता येणार नाही. तसेच एस. टी. महामंडळाची बससुद्धा गावात येणार नाही. तसेच १५ ते २0 गावाची मुख्य रस्त्याची वाहतूक बंद होईल.
गोंदिया मुख्याल ठिकाणी विविध कामानिमित्त परिसरातील नागरिकांना याच मार्गाने ये-जा करावी लागत असून यू आकाराच्या या मार्गामुळे नागरिकांना येथून प्रवास करणे धोकादायक ठरणारे आहे. अशा अनेक समस्या या भुयारी मार्गामुळे नागरिकांना भविष्यात सहन करावा लागत असल्याचा रोष नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे सदर भुयारी मार्गाची मौका चौकशी करून सुरू असलेला भुयारी बांधकाम थांबवून सुरक्षित व स्पष्ट रस्त्याचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा जनआंदोलन तसेच रेल्वेरोको आंदोलन करून शासकीय कामावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंच धाराबाई एन. तुप्पट, आरती केशव चवारे, प्रेमलाल सदुजी कांबळे, मनोजकुमार सरोजकर, पारधी, पुष्पराज जनबंधू यांनी दिला आहे.