नगर परिषदेच्या ” लेट कमर्स”ना नगराध्यक्षांचा दणका

0
10

* आकस्मिक भेटीत अनेक कर्मचारी गैरहजार
* वेतन कपात करण्याचे निर्देश
गोंदिया,दि.14 : नगर परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबतात. याची तक्रार नगर परिषद अध्यक्ष अशोक इंगळे यांच्याकडे आली. तक्रार गांभीर्याने घेत अध्यक्ष अशोक इंगळे यांनी बुधवारी नगर परिषदेच्या विविध विभागांना सकाळी पावणे नऊ वाजता भेट दिली. यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात आलेच नसल्याचे निदर्शनास आले. अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश अध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुख्याधिकारी चंदन पाटील यांना दिले.
गोंदिया नगर परिषद अ वर्ग आहे.शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. नगर अध्यक्ष अशोक इंगळे यांनी विविध विकास कामांचा आराखडा तयार केला. त्यावर तातडीने काम करण्याच्या सूचना त्यांनि कर्मचारी व अधिकारी यांना दिल्या होत्या. मात्र कर्मचारी वेळकाढूपणा करत आहेत. कसलीही सूचना न देता काही कर्मचारी अनुपस्थित राहत आहेत. तसेच कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येत असल्याचे अध्यक्ष अशोक इंगळे यांना समजले. ही बाब गंभीरपणे घेत अध्यक्ष अशोक इंगळे यांनी आज बुधवारी नगर परिषदेच्या स्वच्छता, शिक्षण,आरोग्य,बांधकाम,कर, महिला व बाल कल्याण, लोकपाल, लेखा, लायसेन्स, प्रशासन आदी विभागांना सकाळी पावने दहा वाजता भेट दिली. या आकस्मिक भेटीत अनेक कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रकार मुळीच खपवून घेणार नसल्याचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी खडसावून सांगितले. तसेच दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याचे निर्देश मुख्याधिकारी चंदन पाटील यांना दिले.यावेळी अध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासोबत नगरसेवक विवेक मिश्रा, सतीश मेश्राम,पप्पू अरोरा, दीपक कदम, राजा कदम, मुजीब पठाण, चंद्रभान तरोने, प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे उपस्थित होते.