अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
11

 गोंदिया, दि. 21 : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेती संरक्षित सिंचनाखाली यावी यासाठी अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प आणि वाहतूकीची चांगली सुविधा ग्रामीण भागात निर्माण करण्यासाठी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.धानभवनातील सभागृहात आज 21 डिसेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, गोपालदास अग्रवाल, विजय रहागंडाले, संजय पुराम, मुख्य सचिव सुमित मल्लीक, अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासचे प्रधान सचिव आय. एस. चहल, रोहयोचे सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

 फडणवीस म्हणाले, भात पिकाला विमा देण्याबाबतचे निकष केंद्र सरकारकडून शिथिल करुन घेण्यात येईल, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सालेकसा या नक्षलग्रस्त तालुक्यातील दरेकसा ते मुरकुटडोह हा अतिदुर्गम भागातील रस्ता तयार करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. रस्त्यांच्या सुविधेमुळे दुर्गम भागातील गावे तालुक्याशी जोडल्यास मदत होईल. रस्त्यांची कामे करतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घ्यावे. पोलिसांसाठी गृह निर्माण योजनेतून तातडीने शासकीय निवासस्थाने तसेच पोलीस स्टेशन व सशस्त्र दूर क्षेत्रच्या इमारती बांधण्याचे काम हाती घ्यावे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 91 हजार लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आधी त्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या कामासाठी पहिला हप्ता राज्य सरकार देणार आहे. घरकुलांची कामे वेळीच पूर्ण व्हावीत यासाठी आवश्यक ते अभियंते देखील देण्यात येतील. गोंदिया शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष देवून यासाठी नगरपालिकेला सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबवावे. जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या शौचालयाची कामे रोहयोतून पूर्ण करण्यात यावी यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्याला व तालुक्याला जोडणारी महत्वाच्या रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत. यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी चांगली सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

 धरणाच्या पायथ्याशी पर्यटन विषयक सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यामुळे जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील  व स्थानिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. मागील काही वर्षापासून थकीत असलेले धान गोदामाचे भाडे देखील संबंधितांना त्वरीत देण्यात येईल. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कालवे वनविभाग क्षेत्रातून जात असेल तर त्या भागात पाईप लाईन टाकून ही कालवे पूर्ण करावी. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम देखील तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री श्री. बडोले यावेळी म्हणाले, झाशीनगर उपसा सिंचन योजना ही नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे त्या भागातील जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्यासाठी ही योजना त्वरीत पूर्ण करावी. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी वन विभागाने आवश्यक त्या परवानग्या उपलब्ध करुन द्याव्यात. वर्ष 2015 मध्ये घरकुल योजनेतून सुटलेल्या कुटुंबांची नावे पुन्हा यादीत समाविष्ठ करावीत. त्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ देता येईल. गोंदिया जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.फुके यांनी गोदमाचे 17 कोटी थकीत असलेले भाडे त्वरीत देण्यात यावे. जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार अग्रवाल यांनी आरोग्य उपकेंद्र बांधले असून तेथील पदांना मान्यता मिळावी, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंताचे कार्यालय गोंदिया येथे व्हावे, बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी व गोंदिया शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. पिंडकेपार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देणे, डांगुर्ली येथे नदीवर बॅरेज तयार करण्यात यावे. रजेगाव व तेढवा/शिवनी प्रकल्प जून 2018 पर्यंत पूर्ण व्हावा, अशी  मागणी यावेळी केली.आमदार पुराम यांनी सालेकसा व देवरी हे तालुके नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील असल्यामुळे या भागात रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात झाली पाहिजे तसेच या भागातील अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण झाली पाहिजे अशी मागणी केली.आमदार रहागंडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा तिसरा टप्पा त्वरीत पूर्ण झाला पाहिजे यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच परसवाडा-धापेवाडा-गोंदिया या रस्त्याच्या दर्जोन्नतीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी केली.जिल्हाधिकारी काळे यांनी विविध योजनांच्या विकासकामांचे सादरीकरण केले. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठाकरे यांनी स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची तसेच घरकुल योजनेच्या प्रगतीबाबतची देखील माहिती दिली.पोलीस अधिक्षक डॉ. भूजबळ यांनी पोलीस गृह निर्माण योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. नक्षलग्रस्त भागात सशस्त्र दूर क्षेत्रांतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजना, नक्षलग्रस्त भागात आवश्यक असलेल्या रस्त्यांची माहिती दिली.  यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.