जमीन अधिग्रहणानंतरच इतवारी-नागभीड ब्रॉडगेज

0
5

नागपूर दि.४ :: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थाक सुनील सिंह सोईन यांनी आज गोंदिया-इतवारी सेक्शनचा वार्षिक पाहणी दौरा केला. दौऱ्यात त्यांनी जमीन अधिग्रहण झाल्यानंतर इतवारी-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. जबलपूर-गोंदिया व छिंदवाडा-नागपूर दरम्यान ब्रॉडगेज लाईन तयार झाल्यानंतर इतवारी रेल्वेस्थानकाचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाव्यवस्थापकांनी विभागातील रेल्वेस्थानकांची चांगली देखभाल केल्याबद्दल एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि ग्रुप अवॉर्ड देण्याचे जाहीर केले.
वार्षिक पाहणी दौऱ्यादरम्यान महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कोचेवानी, मुंडीकोटा-तुमसर दरम्यानचा पूल, तुमसर रेल्वेस्थानक, वैनगंगा पूल, रेल्वे कॉलनी, हेल्थ युनिट, आरपीएफ पोस्ट, भंडारा रेल्वेस्थानक, रेल्वेगेटचे निरीक्षण केले. भंडारा रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थांच्या युनिटमध्ये त्यांनी नाश्ता घेऊन खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासली. त्यानंतर ते इतवारी रेल्वेस्थानकावर पोहोचले. येथे अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेन, अ‍ॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट ट्रेन, गार्ड लॉबी, ब्रेल लिपी सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी प्रवासी सुविधा आणि सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महाव्यवस्थापक सोईन मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालयात गेले. येथे त्यांनी नैनपूर येथे तयार करण्यात आलेल्या रेल्वे संग्रहालयात स्थापन करण्यात आलेल्या रेल्वेच्या ऐतिहासिक बाबींच्या माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन केले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल आणि अधिकारी उपस्थित होते.