महापौर चषक महिला कुस्ती स्पर्धा ; ९00 कुस्तीपटू होणार सहभागी

0
18

नागपूर,दि.४ : नागपूर महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर चषक २0 वी सीनिअर महिला व दुसरी सबज्युनिअर अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १९ ते २१ जानेवारीदरम्यान महाल येथील रा. पै. सर्मथ स्टेडियम, चिटणीस पार्क येथे ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी आयोजन समितीचे कार्याध्यक्ष व मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आयोजन परिषदेचे सचिव व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश कोहळे, विदर्भ कुस्ती संघाचे सचिव सीताराम भोतमांगे उपस्थित होते.
१९ जानेवारीला राज्यभरातील खेळाडूंचे आगमन होईल. वैद्यकीय तपासणीनंतर २0 जानेवारीला सकाळी ८ वाजतापासून स्पर्धेला प्रारंभ होईल. औपचारिक उद््घाटन २0 जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. समारोप २१ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता होईल. दोन्ही कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, मनपातील विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे तसेच महाराष्ट्रातील आजी व माजी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी उपस्थित राहतील. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.
सीनिअर मुलींच्या गटात ५0, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ आणि ७६ किलो वजनाच्या आत अशा वजनगटात स्पर्धा होतील. सबज्युनिअर मुलींच्या गटात ४0, ४३, ४६, ४९, ५२, ५७, ६१, ६५, ६९ व ७३ किलो या वजनगटात स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी ४५ मनपा व जिल्हा संघ सहभागी होणार असून प्रत्येक संघात प्रत्येकी १0 खेळाडू असे एका संघात २0 खेळाडू राहतील. एकूण ९00 खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्पर्धेत एकूण महापौर चषक कुस्ती स्पर्धेअंतर्गत एकूण चारशे कुस्त्या होतील. १५ बाय ३0 मीटर रुंद व १ मीटर उंच असे प्लॅटफार्म तयार करून मॅटवर या स्पर्धा घेण्यात येतील. सर्व खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था आमदार निवास येथे करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश कोहळे यांनी सांगितले.