स्वच्छता दर्पण रँकिंगमध्ये चंद्रपूर देशात पहिले

0
12

चंद्रपूर,दि.07ः-जिल्हा परिषदेने गेल्या २ ऑक्टोबर २0१४ पासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या हागणदारीमुक्त उपक्रमाला यश येत आहे. जिल्ह्य़ात अवघे १७६ कुटुंबांकडे शौचालय बाकी असून, देशात हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करणार्‍या जिल्ह्य़ामध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. २६ जानेवारीपूर्वी जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मागदर्शनात सुरू असलेल्या या प्रयत्नाला स्वच्छता दर्पण अनुक्रमाणिकेत भारतात पहिले स्थान मिळाले आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी देशभरातील जिल्ह्य़ांचे स्वच्छता दर्पण अनुक्रमाणिक देण्यात आले आहे. त्यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणार्‍या चंद्रपूर जिल्ह्य़ाने पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्य़ाला ६९.११ टक्के गुण मिळाले.
केंद्र शासनाने केलेल्या मूल्यांकनात महाराष्ट्रातील बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर मेघालयातील वेस्टखसी हिल्स, पंजाबमधील अमृतसरचा तिसरा, तर राजस्थानमधील डोलपूर जिल्ह्य़ाला पाचवा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्रातील नाशिक ७, लातूर ९, अहमदनगर १0, उस्मानाबाद १६, औरंगाबाद ३८, अकोला ४२, परभणी ४५, वाशीम ५0, धुळे ५५, हिंगोली ६0, जळगाव ६३, तर अमरावती जिल्हा ६५ व्या क्रमांकावर आहे.
ग्रामीण भागातील गावे सुंदर व्हावी, गावात शाश्‍वत स्वच्छता कायम राहावी यासाठी केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले. राज्यात चंद्रपूर नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. केंद्र पुरस्कृत अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेला ३ लाख ३ हजार १३५ वैयक्तिक प्रसाधनगृहे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्णत्वास नेले आहे. जिल्ह्य़ातील संपूर्ण ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचे निकष देण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदेला आतापयर्ंत ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून, लवकरच उर्वरित ४ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे.
येत्या जानेवारी अखेरपयर्ंत संपूर्ण जिल्हा गोदरीमुक्त करण्याचा ध्यास घेतला गेला असून, तशी वाटचाल सुरू केली आहे. या कामात चंद्रपूर जिल्हा परिषदेला ४२.५0 टक्के गुण प्राप्त झाले आहे. नादुरुस्त प्रसाधनगृहांची कामे करण्यात जिल्हा परिषद मागे पडली.
जिल्ह्य़ात २२ हजार नादुरुस्त प्रसाधनगृहे आहेत. त्यापैकी आतापयर्ंत ६ हजार प्रसाधनगृहांचे काम करण्यात आले असून, उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय केलेल्या कामांचे चित्र ऑनलाईनमध्ये लोडिंग करावे लागतात. त्यातही जिल्हा परिषद मागे पडली आहे. या मूल्यांकनात ज्या कामांमध्ये कमी गुण मिळाले. त्या कामांची गती वाढविली जाईल. शिवाय कामे जलदगतीने करून गावात शाश्‍वत स्वच्छता व त्या कामांची पारदर्शकता टिकविण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते यांनी दिली.