भारनियमनाची समस्या सोडवू-ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे

0
12

तुमसर : तत्कालीन आघाडी सरकारने नियोजन न केल्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागते. राज्यशासन आता पुढील १५ वर्षाचे नियोजन करुन त्या प्रमाणात वीज प्रकल्पांच्या उभारणीवर भर देत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विजेची समस्या लवकरच सोडविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिली.

तुमसर पंचायत समितीमधील तालुका विक्री केंद्राचे भूमिपूजन, विवेकानंद सभागृह आणि उद्यानाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, सभापती संदिप टाले, उपसभापती वासुदेव वाडीभस्मे, जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, पंचायत समिती सभापती कलाम शेख, उपविभागीय अधिकारी अशोक लटारे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जेजूरकर, माजी खासदार शिशुपाल पटले उपस्थित होते.

यावेळी ना. बावनकुळे म्हणाले, सरकारी योजना आणि अनुदान लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्याचे आर्थिक सर्व्हेक्षण केले पाहिजे. त्या आधारावर रॉकेल, गॅसचे अनुदान आणि रेशनकार्ड देण्यात यावे. जिल्हयाचा जो विकास आराखडा खासदार व आमदारांनी तयार केलेला आहे. त्यासाठी निधी आणणे ही माझी जबाबदारी आहे.

यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारांचा प्रभाव संपूर्ण तालुकाभर पोहचवावा. सुंदर पंचायत समिती तयार करण्याचे काम सभापती कलाम यांनी केले. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी अशीच साथ द्यावी, भंडारा आणि गोंदिया जिल्हयाला भारनियमनमुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार चरण वाघमारे, पंचायत समिती सभापती कलाम शेख यांची समयोचित भाषणे झाली.