विभाग प्रमुखांची मंत्रालयात होणार सुनावणी!

0
6

वाशिम,दि.१९(विशेष प्रतिनिधी) : १७ ते १९ जानेवारी दरम्यान विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या निदर्शनात वाशिम जिल्हा परिषदेच्या काही विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आली असून, संबंधित विभाग प्रमुख व अधिका-यांची मंत्रालयात (मुंबई) सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी शुक्रवारी दिली. जिल्हा परिषदेच्या स्थानिक वसंतराव नाईक सभागृहात सन २०१३-१४ या वर्षातील वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात अधिका-यांची साक्ष घेतल्यानंतर पारवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली.
१७ जानेवारीला पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्यासह १० आमदार सदस्य व मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाºयांनी वाशिम जिल्हा परिषदेच्या २०१२-१३ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात तसेच वार्षिक अनुपालन अहवालाच्या अनुषंगाने एकूण ५६ आक्षेपांवरील तपासणी व सुनावणी घेतली. १८ जानेवारी  पंचायत राज समितीच्या तीन पथकांनी दिवसभरात सहा पंचायत समिती स्तरावर स्तरावर गटविकास अधिकारी व संबंधित अधिका-यांची प्रश्नावली क्रमांक दोनसंदर्भात सुनावणी घेतली. तसेच सहा तालुके पिंजून काढत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय व अनुदानित वसतिगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन दवाखाने यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीशी संबंधित कार्यालयांची आकस्मिक पाहणी केली. काही ठिकाणी अनियमितता आढळली तर काही ठिकाणी समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.
१९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषदेच्या सन २०१३-१४ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागप्रमुखांची साक्ष घेण्यात आली. २ वाजेपर्यंत चाललेल्या या तपासणी व सुनावणीदरम्यान काही योजनांची अंमलबजावणी करताना दिरंगाई झाली तसेच काही विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आल्याची समिती अध्यक्षांसह सदस्यांच्या निदर्शनात आले. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधत, अनियमितता करणारे काही विभागप्रमुख व अधिकारी हे पंचायत राज समितीच्या रडारवर असल्याचे सुतोवाच केले.