वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही

0
8

गोंदिया,दि.१९:-वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभिर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण कर्मचारी उन्ह, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचा-यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते अशांसाठी भा.दं.वि. चे कलम ३५३ या कलमान्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भुमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.

वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येत असून, कलम ३५३ नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतुद आहे कलम ३३२ नुसार तीन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतुद असून कलम ५०४ व ५०६ नुसार प्राणांकीत हल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सर्व कलमांचा कठोर वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे.

वीज कर्मचा-यांना होणा-या मारहाणीच्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ङ्कवीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा ह्या मोफ़त वापरायसाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत असल्याने महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहीला आहे. थकबाकी वसुल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.

महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफ़ोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे?ङ्क असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. ङ्कउद्दीष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीज पुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. थकबाकीपोटी आपला वीज पुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार अलीकडच्या काळात राज्यात सर्वत्र वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत.