विदर्भाच्या मुद्यावर एकत्र लढणार लोकसभा-विधानसभा

0
12

नागपूर,दि.19 : सत्तेत आल्यावर वेगळा विदर्भ देऊ या आश्वासनाचा भाजापाला विसर पडला आहे. काँग्रेसने तर वेळोवेळी वेगळ्या विदर्भाचा विरोध केला आहे. आता भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष विदर्भ देणार नाहीत हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विदर्भवादी पक्ष, संघटनांना एकत्र करून एक महाआघाडी उभारायची आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका विदर्भाच्या मुद्यावर लढायच्या, असा निर्णय रविवारी विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे व ‘स्वराज इंडिया’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्या बैठकीत घेण्यात आला.
यादव रविवारी सकाळी नागपुरात आले. रामनगर येथील स्वराज इंडियाच्या कार्यालयात त्यांची अ‍ॅड. अणे यांच्याशी तासभर बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेत अ‍ॅड. रवि सन्याल, संदेश सिंगलकर, गिरीश नांदगावकर उपस्थित होते. बैठकीत अ‍ॅड. अणे यांनी विदर्भाच्या मुद्यावर सर्व विदर्भवादी पक्ष व संघटनांना एकत्र आणून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव ठेवला. योगेंद्र यादव यांनी हा प्रस्ताव मान्य करीत स्वराज इंडिया देखील यात सहभागी होईल, असे आश्वास्त केले. चर्चेत शेकाप, भारिप, रिपाईचे सर्व गट, आम आदमी पार्टी, विदर्भ माझा यांच्यासह विदर्भवादी पक्ष व संघटनांना एकत्र करून एक महाआघाडी उभारण्याचे ठरले. लवकरच संबंधितांशी चर्चा केली जाईल व सर्वांना एका मंचावर आणून त्याची रितसर घोषणा केली जाईल, असाही निर्णय घेण्यात आला.