लेखी आश्‍वासनानंतर आमगाव खुर्दवासियांच्या उपोषणाची सांगता

0
9

सालेकसा,दि.04ः-आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतीमध्ये समावेश करावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या दोन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने उपोषणाची दखल घेत न्यायालयाने सुनावणीदरम्यान आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतमध्ये समावेश करण्याच्या आदेशाचे पालन करून चार महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने बेमुदत उपोषणाची सांगता करण्यात आली. परंतु, लेखी आश्‍वासन मिळाले नसल्याने साखळी उपोषण सुरू ठेवण्यात आले होते. शेवटी आज (दि.४) न्यायालयाच्या आदेशाची लेखी प्रत उपोषणकर्त्यांना तालुका प्रशासनाने दिल्यानंतर या उपोषणाची सांगता झाली. यामुळे येत्या चार महिन्यात आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगर पंचायतीमध्ये समावेश होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
राज्य शासनाने तालुकास्थळांना नगरपंचायतीचा दर्जा बहाल केला. सालेकसा व आमगाव खुर्द या दोन्ही ग्रामपंचायती लागून होत्या. तसेच सर्व शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था आमगाव खुर्दमध्ये असल्याने आमगाव खुर्दचा सालेकसा नगरपंचायतमध्ये समावेश करून त्यानंतरच नगरपंचायतीच्या निवडणूका घ्याव्या, यासाठी आमगाव खुर्दवासीयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, प्रशासन समावेशाची आखणी योग्यरित्या करू शकले नाही. परिणामी २ वर्षांनंतर सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणूका घेण्यात आल्या. यावेळीही ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली. मात्र, यश आले नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्यात घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमगाव खुर्दवासीयांनी बहिष्कार घातला. पुन्हा जानेवारी महिन्यात या निवडणूका पुन्हा लागल्या. यावेळीही ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला. तसेच यापूर्वीच समावेशासाठी प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
एकंदरीत प्रशासन समावेशाला घेऊन टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने ग्रामस्थांनी २८ फेब्रुवारीपासून अनिश्‍चितकालीन आमरण व साखळी उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनाची दखल घेत न्यायालयाने शासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. मात्र, शासनाकडून दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने २८ मार्च रोजी ऑक्टोबर २0१५ मध्ये काढलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून चार महिन्यात अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
त्या अनुषंगाने आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली होती. परंतु, लेखी आश्‍वासन मिळेपयर्ंत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यां ग्रामस्थांनी घेतला होता. त्यातच न्यायालयाच्या निर्णयाची लेखी प्रत तालुका प्रशासनाने (दि.४) साखळी उपोषणकर्त्यांनी सादर केली. त्यामुळे या उपोषणाची सांगता करण्यात आली असून आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतीमध्ये समावेशाचा मार्ग सुकर झाला.