लोकसभा पोटनिवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवा – जिल्हाधिकारी

0
30
????????????????????????????????????

 आचारसंहितेचे काटेकोर पालन करा   आपसात संवाद ठेवा
 १७ लाख ४८ हजार ६७७ मतदार  २१२६ मतदान केंद्र
भंडारा, दि. २७ :- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला असून २८ मे २०१८ रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभेची पोटनिवडणूक असली तरी या निवडणूकीचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. विविध समित्या स्थापन करुन आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. ही निवडणूक पोलीस व जिल्हा प्रशासनाने अतिशय पारदर्शकपणे राबवावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज भंडारा-गोंदिया जिल्हयातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.मतदारसंघात  १७ लाख ४८ हजार ६७७ मतदार असून २१२६ मतदान केंद्र राहणार आहेत.
गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे, पोलीस अधिक्षक विनीता साहू, गोंदिया पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यावेळी उपस्थित होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार याद्या तात्काळ तपासून घ्याव्यात, कर्मचाऱ्यांचे नियोजन, प्रशिक्षण, विविध समित्या, वाहतुक आराखडा, कायदा व सुव्यवस्था, आचारसंहिता कक्ष, विविध परवानग्यासाठीची व्यवस्था आदी बाबत तात्काळ नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
या निवडणूकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असून त्याबाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. पोलींग पार्टीसाठी वाहतुक व्यवस्था, पिण्याचे पाणी व भोजन व्यवस्था योग्य असेल याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवडणूक प्रक्रिया ही उत्तम व्यवस्थापन शिकविणारी प्रक्रिया असून कुठलाही ताण न घेता आनंदाने या प्रक्रियेत सहभागी व्हा, असा सल्ला जिल्हाधिकारी यांनी दिला. मतदानासाठी नियुक्त महिलांची सुरक्षा महत्वाची असून यासाठी पोलीस पाटलांची बैठक घेवून त्यांना याबाबत जबाबदारी सोपविण्यात यावी.
प्रत्येक विषयाची समिती स्थापन करुन नोडल अधिकारी नेमावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सभेसाठी परवानगी देतांना फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्वाचा अवलंब करावा. सिमेलगतच्या चेक नाक्यावर विशेष नजर ठेवावी. अवैध दारु वाहतुक, रोख वाहतुक, जेवणावळी आदी बाबींना प्रतिबंध घाला. यावेळी गोंदिया जिल्हाधिकारी यांनी महत्वाच्या सूचना केल्या. निवडणूक प्रक्रिया सुरु असली तरी पाणी टंचाई या विषयाकडे दुर्लक्ष करु नये असे त्यांनी सांगितले. धार्मिक व सामाजिक सलोखा अबाधित राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी दिलीप भुजबळ यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.
१ जानेवारी २०१८ अर्हता दिनांकावर अंतिम मतदार यादी खालील प्रमाणे आहे.
विधानसभा           मतदान केंद्र            पुरुष मतदार          स्त्रि मतदार                  एकूण
६०-तुमसर                   ३५१                    १४७५९८                 १४२७३३                  २९०३३१
६१-भंडारा                     ४५५                   १७८५३९                 १७७९१५                  ३५६४५४
६२- साकोली                 ३९२                   १५५८२८                 १५०३४७                  ३०६१७५
६३-अर्जुनी मोर             ३०५                   १२४१२५                 १२१६४७                  २४५७७२
६४- तिरोडा                   २८८                   १२१८१६                 १२३३०३                  २४५११९
६५- गोंदिया                  ३३५                   १५०१४७                 १५४६७९                  ३०४८२६
एकूण                           २१२६                 ८७८०५३                  ८७०६२४                 १७,४८,६७७