मतदान यंत्रांचे केले सरमिसळीकरण;राजकीय पक्ष प्रतिनिधींची उपस्थिती

0
12

गोंदिया,दि.२३ : येत्या २८ मे रोजी होणारी भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे प्राथमिक पातळीवर सरमिसळीकरण निवडणूक निरीक्षक तेजप्रतापसिंग फुल्का यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाकरीता वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रापासून सरमिसळीकरणाला सुरुवात करण्यात आली. अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील-३०५, तिरोडा विधानसभा मतदारसंघातील-२८९ आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघातील-३४५ असे एकूण ९३९ मतदान केंद्रावर प्रत्येकी एक कंट्रोल युनिट व एक व्हीव्हीपॅट मशीन आणि दोन बॅलेट युनिटचा वापर करण्यात येणार आहे. याचे सरमिसळीकरण यावेळी करण्यात आले.
आज प्राथमिक पातळीवर करण्यात आलेल्या सरमिसळीकरणाच्यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक सहारे, भारतीय जनता पार्टीचे प्रचार-प्रसिध्दी प्रमुख जयंत शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नानु मुदलीयार, रवी मुंदडा, संजीव राय, जिम्मी गुप्ता, मनिष अग्रहारी, एकनाथ वहिले यांच्यासह अन्य प्रतिनिधींची उपस्थिती होती.
मतदान यंत्रात सेटींग होत असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री.फुल्का म्हणाले, मतदान यंत्रामध्ये कुठलेही सेटींग होत नाही. तो राजकीय पक्षांचा गैरसमज आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, सहायक जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री.वासनिक, तहसिलदार प्रशांत सांगळे, साहेबराव राठोड, नायब तहसिलदार राजश्री मलेवार यांची उपस्थिती होती.