अवयवदान हीच खरी मानवसेवा : रवी वानखेडे

0
9

नागपूर,दि.25: ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले.
जनमंचतर्फे अवयवदान काळाची गरज या विषयावर डॉ. रवी वानखेडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन शंकरनगरच्या बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी बालरोगतज्ज्ञ डॉ. विभावरी दाणी होत्या. व्यासपीठावर जनमंचचे अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष डॉ. अमिताभ पावडे उपस्थित होते. डॉ. वानखेडे म्हणाले, अवयवदान कायदेशीर आहे. १९९४ मध्ये याबाबतचा कायदा झाला. अवयवदानात ४० ते ५० प्रकारचे अवयव दान करता येऊ शकतात. बोनमॅरो, किडनी, लिव्हर हे अवयव जिवंत व्यक्ती देऊ शकतात, तर मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान, स्कीन दान करता येते. एका व्यक्तीच्या दोन डोळ्यांमुळे आठ जणांना दृष्टी मिळु शकते. मेंदू मृत झाल्याचे चार डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर नातेवाईकांना समजावून त्यांना अवयवदानासाठी प्रेरित करण्यात येते. मेंदू मृत झाल्यानंतर व्हेंटीलेटरमुळे दोन-तीन तासापासून तर दोन ते तीन दिवसापर्यंत अवयव जिवंत राहतात. देशात अवयवदानाची खूप गरज आहे. भारतात दरवर्षी दोन लाख किडनी लागतात. परंतु प्रत्यक्षात १० हजार प्रत्यारोपण होतात. विकसित देशात मेंदू मृत झालेल्या ९० टक्के नागरिकांचे अवयवदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांनी नेत्रदान केल्यास लोकसंख्येमुळे आपण जगाला कॉर्निया पुरवू शकत असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कोणत्याही धर्मात अवयवदानाला विरोध नाही. अवयवदानासाठी नागपुरात नोटो संघटना असून, या संघटनेचे काम कसे चालते, ते त्यांनी सांगितले. डॉ. विभावरी दाणी यांनी मृत्यूनंतर त्वचा दान केल्यास व्यक्तीचा मृतदेह विद्रूप होत नसून, ही त्वचा पाच वर्षापर्यंत स्कीन बँकेत साठविता येत असल्याचे सांगून, अवयवदानाची चळवळ फोफावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जनमंचचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील यांनी ग्रीन कॉरिडॉरमुळे मृत्यूनंतर अवयवांना व्हीआयपी वागणूक मिळते ही समाधानाची बाब असून, अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जनमंचचे उपाध्यक्ष अमिताभ पावडे यांनी प्रशिक्षण दिल्यासअवयवदानाबाबत जनजागृतीसाठी जनमंचचे सर्व कार्यकर्ते तयार राहू, असे आश्वासन दिले. संचालन सुहास खांडेकर यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.