अहेरीत होणार प्रशासकीय इमारत

0
7

अहेरी : पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी नगर पंचायतीला पाच कोटी रूपयांचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर केला आहे. या निधीतून नवीन प्रशासकीय इमारत व व्यापार संकुलाची निर्मिती होणार आहे.
अहेरीत नगर पंचायतीची स्थापना होऊन तीन वर्ष झाल्यावरही नगर पंचायतीला प्रशासकीय इमारत मिळाली नाही. सध्या नगर पंचायतीचा कारभार ब्रिटिशकालीन जुन्या इमारतीतुन चालत आहे. या ठिकाणी अपुरी जागा असल्याने नगर पंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी तसेच जनतेला प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.
अहेरी नगर पंचायतीचे मुख्य चौकात असलेले व्यापार संकुल हे ३५ वर्ष जुने असल्याने ती इमारत सद्या पूर्णपणे जीर्ण आहे. हे दोन्ही अति महत्वाचे कामे अहेरी नगर पंचायत कडे निधी उपलब्ध नसल्याने रखडले होते. नगराध्यक्ष हर्षा ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने गुरूवारी नागपूर येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची विधान भवनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी या मागणीचा अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत अर्थमंत्र्यांनी पाच कोटी रूपयांचा नधी प्रशासकीय इमारत व भव्य व्यापार संकुल बांधकामासाठी देण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भातील पत्र पाच दिवसांत नगर पंचायतीला देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
शिष्टमंडळात भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, शहराध्यक्ष मुकेश नामेवार, भाजपा युवा मोर्चा अहेरी तालुका अध्यक्ष गुड्डू ठाकरे, भाजपा अहेरी शहर उपाध्यक्ष श्रीकांत नामनवार यांच्या समावेश होता