भूमिगत गटार योजनेवरुन सर्वसाधरण सभेत गदारोळ

0
12

गोंदिया ,दि.27: शहरातील भूमिगत गटार योजनेचा विषय दिवसेंदिवस रेंगाळत चालला आहे. यामुळे शहरवासीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना बुधवारी (दि.२५) आयोजित नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी आक्रमक होत यावरुन अध्यक्षांना जाब विचारला. त्यामुळे सभेत काही वेळ चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान सदस्य आक्रमक झाल्याने अध्यक्षांनी आठ दिवसांनी विशेष सभा बोलावून त्यात हा विषय ठेवण्याचे आश्वासन दिले.
१८ जुलैला तहकुब झालेली सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.२५) दुपारी १२ वाजता नगर परिषद सभागृहात नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. या सभेत मागील सभेतील विषय ठेवण्यात आले होते. सभेला सुरुवात होवून ठेवण्यात आलेले विषय वाचून दाखविण्यात आले. मात्र यात केवळ चारच विषय ठेवण्यात आले होते. यातून भूमिगत गटार योजनेचा पाचवा विषय वगळण्यात आला होता. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी आक्रमक होत भूमिगत गटार योजनेचा विषय का वगळण्यात आला. शहराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण असताना नगराध्यक्षांना हा विषय महत्त्वाचा वाटत नाही का, शहरातील सांडपाण्याची व्यवस्था योग्य होत नसल्याने थोडासाही पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तातडीने भूमिगत गटार योजनेचा विषय मार्गी लावण्याची गरज होती. मात्र नगराध्यक्षांना याचे गांर्भिय नसल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपाचे सदस्य आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सदस्यांची आक्रमकता पाहता अध्यक्षांनी पुन्हा आठ दिवसांनी विशेष सभा बोलावून त्यात हा विषय ठेवण्याचे आश्वासन दिले.