स्वच्छता अभियान कार्यशाळेवर सरपंच, उपसरपंचांचा बहिष्कार

0
11

तिरोडा,दि.28 : शासन स्वच्छता अभियानावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. त्यानुरुप या अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने (दि.२७) स्थानिक पंचायत समिती सभागृहात स्वच्छता सर्वेक्षण २०१८ व संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाविषयी कार्यशाळा ठेवण्यात आली होती.

सभेला तालुक्यातील सर्वच सरपंचांना बोलाविण्यात आले होते. मात्र, तिरोडा पंचायत समितीअंतर्गत कार्यरत शाखा अभियंता नखाले हे बहुतांश सरपंचांशी उद्धट वागूणक करीत असल्याने तसेच महिला सरपंचासोबत गैरवर्तणूक करीत असल्याने सरपंच संघटनेच्या वतीने कार्यशाळेवर बहिष्कार घालण्यात आला.तसेच शाखा अभियंता नखाले यांच्यावर कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन जि.प.चे सीईओ यांना देण्यात आले. पंचायत समितीअंतर्गत कार्यरत शाखा अभियंता नखाले हे बहुतेक सरपंचांना ‘तुम्ही माझ्याकडे यायचे नाही, माझे संबंध फक्त ग्रामसेवक यांच्याशीच आहेत, तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही, सरपंच चोर असतात’, अशी उद्धट वागणूक करीत असतात. तर महिला सरपंचांसोबत गैरवर्तणूक करतात. कामे होऊनसुद्धा मूल्यांकन करीत नाहीत. अवाढव्य पैशांची मागणी करीत असतात. जो पैसे देईल त्याचेच काम होणार असे बोलत राहतात. त्यामुळे शाखा अभियंत्याच्या वागणुकीमुळे वंâटाळलेल्या तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांनी पंचायत समिती सभागृहात  आयोजित स्वच्छता अभियानाच्या कार्यशाळेवर बहिष्कार घातला. तसेच शाखा अभियंता नखाले यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर, सरपंच सौ. ज्ञानेश्वरी वासनिक, सरपंच सौ. रीता पटले, सरपंच सौ. दुर्गा भगत, सरपंच विद्यासागर चौधरी, सरपंच विनोद लिल्हारे, सरपंच सौ. चौरे, सेवेंद्र अंबुले, सरपंच रामकिशोर ठाकुर, उपसरपंच आदित्य कठाणे, अरविंद कांबळी यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.