उपसा सिंचन योजनेचे पाणी खळबंदा जलाशयात सोडा

0
19

तिरोडा,दि.09ः- तालुक्यातील कवलेवाडा स्थित नदीपात्रात तयार करण्यात आलेल्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ चे पाणी त्वरित खळबंदा जलाशयात सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी  उपसा सिंचन प्रकल्प विभागाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
गोंदिया तालुक्यातील खळबंदा जलाशयात आजघडीला ७.00 द.ल.घ.मी. साठा आहे. याची टक्केवारी ४४ एवढी आहे. खळबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातील कास्तकारांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होण्याकरिता जलाशयात पाणी साठा पूर्ण संचय असणे आवश्यक आहे. याकरिता खळबंदा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ च्या खळबंदा उध्र्वनलीकेद्वारे पाणी उपसा करून सोडण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश आमदार विजय रहांगडाले यांनी गोंदिया पाटबंधारे विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता तसेच उपसा सिंचन प्रकल्प विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.
शेतकर्‍यांना आवश्यकतेनुसार खळबंदा जलाशयातून पाणी सोडून सिंचनास सुरुवात करावी, याशिवाय पाण्याचे योग्य नियोजन करून पूर्ण हंगामात पाणी देण्यात यावे. पाणीपट्टीच्या कराबाबत सर्व ग्रामपंचायत व शेतकर्‍यांना नोटीसद्वारे माहिती देण्यात यावी तसेच शेतकर्‍यांनीही वेळेत पाणीपट्टी द्यावी, असे निर्देश आ. रहांगडाले यांनी दिले.
विशेष म्हणजे, मागील वर्षी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-१ च्या उध्र्वनलीकेद्वारे पाणी सोडण्यात आले व त्याचा उहापोहही करण्यात आला होता. मात्र, १0 ते १५ दिवसानंतर ते पाणी बंद झाल्याने जलाशयात जलसिंचन होऊ शकले नाही. त्यातच यंदाच्या हंगामातही उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात येईल, अशी आस होती. परंतु, आमदारांना दखल घ्यावी लागली. आज पार पडलेल्या आढावा बैठकीत आ. रहांगडाले यांच्यासह पाटबंधारे विभाग व उपसा सिंचन योजना विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तेव्हा, आ. विजय रहांगडाले यांनी दिलेल्या निदेर्शावरुन उपसा सिंचन योजनेचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यात येणार की नाही, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष्य लागले आहे.