ग्राम स्वच्छता अभियानात अर्जुनी-मोरगाव तालुकास्तरावर सिरेगावबांध प्रथम

0
3

अर्जुनी मोरगाव,दि.09 : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सन २०१७-१८ अंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुकास्तरावर सिरेगावबांध ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक पटकाविला. दाभना या ग्रामपंचायतने द्वितीय तर मांडोखाल ग्रामपंचायत तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. विजेत्या तिन्ही ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छतेचे निर्मळ वातावरण निर्माण केल्याचे चित्र आहे.
निस्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी स्वत: हातामध्ये झाडू घेऊन गावातील केरकरचा साफ करण्याचा उपक्रम राबविला. रात्री कीर्तनातून जनजागृती करुन अंधश्रध्दा, स्वच्छतेवर मार्मिक प्रबोधन करायचे. अशा त्यागवृत्ती असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या नावानी राज्य सरकार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सातत्याने राबवित आहे. तालुका स्तरावरील अभियानात ग्रामपंचायती सहभागी होतात. सेवाभावी, जागरुक स्थानिक लोकप्रतिनिधी गावात स्वच्छता राहावी, जनतेचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी या अभियानात सहभागी घेऊन प्रत्यक्षात गावकºयांच्या सहभागाने गावाला समृध्दी लाभावी, यासाठी तालुक्यातील सरपंच व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
तालुका स्तरावर क्रमांक पटकाविणाºया ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांचा पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. बचत भवनात आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, मुख्य लेखा अधिकारी मडावी, उपसभापती करुणा नांदगावे, जि.प.सदस्या मंदा कुंभरे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, आशा झिलपे, नाजुका कुंभरे, सहाय्यक खंड विकास अधिकारी मयूर आंदेलवाड उपस्थित होते. सर्वप्रथम सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन व मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या ग्रामपंचायत सिरेगावबांध, द्वितीय दाभना, तृतीय मांडोखाल ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांचा शाल, श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी राजू वलथरे यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी अनुपकुमार भावे यांनी मानले.