प्रकल्पग्रस्तांचा शेतात ठिय्या;’अंबुजा’विरोधात प्रहारचे आंदोलन

0
6

गडचांदूर,दि.10 : ‘अंबुजा चले जाओ’चा नारा देत प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी अंबुजा कंपनीविरोधात आंदोलन केले. यावेळी सोनापूरमध्ये आंदोलन होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी तेथे फौजफाटा लावला होता. परंतु, आंदोलनकर्त्यांनी विसापूर येथून आंदोलन सुरू करीत शेकडो प्रकल्पग्रस्तांनी शेतामध्ये ठिय्या मांडून प्रशासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. .

प्रहारचे पप्पू देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. विसापूर येथून प्रकल्पग्रस्त शेताकडे निघाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा सोनापूर येथून विसापूरच्या दिशेने निघाला. तोपर्यंत आंदोलकांनी हातात तिरंगा व शेतीची अवजारे घेऊन शेतीमध्ये प्रवेश केला. कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात नारेबाजी केली. त्यानंतर गडचांदूरचे पोलीस निरीक्षक कोंडावार व पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा फौजफाटा आंदोलनस्थळी पोहोचला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राजुराचे तहसीलदार होळी यांना आंदोलनस्थळी पाचारण करण्यात आले. तहसीलदार होळी यांनी यावेळी जिल्हाधिकारी व राजुराचे उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने अंबुजा प्रकरणात चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात अंबुजा कंपनीने आदिवासींची फसवणूक केल्याची बाब स्पष्ट झाली. जिल्हा प्रशासनाने या अहवालानुसार अंबुजाविरूध्द तातडीने कारवाई करावी अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी लावून धरली. .

आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे.आंदोलनामध्ये प्रहारचे फिरोजखान पठाण, चंद्रपूर मनपाचे अपक्ष नगरसेवक स्नेहल रामटेके, प्रहारचे कोरपना तालुकाध्यक्ष ईसाक बेग, अफरोज अली, गौरकार व शेकडो प्रकल्पग्रस्त आदिवासी तसेच पकडीगुड्डम धरणामुळे प्रकल्पग्रस्त झालेले सर्व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांनी आंदोलनस्थळी जावून प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. .