कारवाई न करताच सोडले रेतीचे ट्रॅक्टर

0
12

सडक-अर्जुनी,दि.03ः-  तालुक्यातील सौंदड/ फुटाळा येथील नदीतून रेतीची तस्करी करणार्या रेती माफीयांचे ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केले. परंतु मंडळ अधिकारी व तलाठ्याने कारवाई न करताच ट्रॅक्टर सोडल्याने संबधितावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
३० आॅगस्ट रोजी फुटाळा येथील नदीतून रेती चोरून नेत असताना फुटाळा येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती तसेच गावकºयांनी त्या ट्रॅक्टरला अडविले. रेती वाहून नेणाऱ्यांकडे रॉयल्टी नसतांना रेतीची वाहतूक केली जात होती. या घाटाचा लिलाव झाला नसताना रेतीची चोरी होत असताना पाहून गावकऱ्यांनी तहसीलदार सडक-अर्जुनी यांना फोन केला.
तहसीलदार यांनी त्या परिसरातील मंडळ अधिकारी जांभूळकर, तलाठी रहांगडाले यांना घटनास्थळी पाठविले.मंडळ अधिकारी व तलाठी घटनास्थळावर पोहचून त्यांनी रॉयल्टी विचारली असता त्या ट्रॅक्टर चालकांकडे रॉयल्टी नव्हती. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर ट्रॅक्टरवर कारवाई न करताच ट्रॅक्टरमध्ये भरलेली रेती खाली करून ट्रॅक्टर घरी परत नेण्यास सांगितले.सदर ट्रॅक्टरवर कारवाई न झाल्यामुळे ग्रामपंचायत फुटाळाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व गावकरी यांनी यासंदर्भात तहसीलदार, पोलीस ठाणे येथे तक्रार केली. तलाठी, मंडळ अधिकारी व रेती माफियांवर कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन करू असा इशारा गावकºयांनी दिला आहे.