दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई

0
9

चंद्रपूर,दि.04ः-  शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर येथे वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या सुनील खंडेलवाल व समीर पाल या दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.सदर कारवाई मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. अंजली आंबटकर यांच्या मार्गदर्शनात मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया खेरा, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सचिन पाटील, नामदेव राऊत यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.

मनपा आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार मनपा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया खेरा यांनी बोगस डॉक्टर शोध मोहीम पथकासह निकुंज हॉस्पिटल, भिवापूर वॉर्ड येथे दिनांक २९ ऑगस्ट रोजी भेट दिली. तेथे निकुंज हॉस्पिटलचे संचालक सुनील खंडेलवाल हे महाराष्ट्र नसिर्ंग होम नोंदणी कायदा १९४९ अंतर्गत निकुंज हॉस्पिटलची नोंदणी मनपाकडे करण्यात आलेली नसतांना, अनधिकृतरित्या १0 खाटांचे नसिर्ंग होम चालवीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच अँलोपॅथी औषधांचा साठा आढळून आला.
त्याचप्रमाणे समीर पाल नावाचा व्यक्तीही वैद्यकीय व्यवसाय करतांना आढळून आला. त्यांच्या दवाखान्यात चौकशी केली असता घरगुती जागेत अँलोपॅथी औषधीचा वापर तसेच रुग्णांची तपासणी करीत असतांना आढळून आले. महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (१) नुसार वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी राज्यात कार्यरत विविध वैद्यकीय परिषदांकडे वैद्यकीय व्यावसायिकाने नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. समीर पाल यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय शैक्षणिक अर्हता तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणीचे प्रमाणपत्र याबाबत मागणी केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृत कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. चौकशी दरम्यान सदर व्यावसायिक अँलोपॅथी औषधीचा वैद्यकीय व्यवसाय करतो असे आढळून आले. त्यामुळे तपासणी चमुद्वारे सुनील खंडेलवाल व समीर पाल या दोन्ही व्यवसायीकां विरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.