रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा- खासदार भावना गवळी

0
33
  • रस्ता सुरक्षा समिती बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
  • अपघातास कारणीभूत अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना

वाशिम, दि. १४ : रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत असून हे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्ष तथा खासदार भावना गवळी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सय्यद समरीन यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. गवळी म्हणाल्या, वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रबोधनासोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विशेषतः शहरी भागात रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथला निर्माण होवून अपघात घडतात. त्यामुळे पार्किंगसाठी विशिष्ट जागा ठरवून देवून रस्त्यांवर होणारे पार्किंग बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आमदार श्री. पाटणी म्हणाले, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच रस्ते वाहतूक सुरक्षित होण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती घेत असलेल्या निर्णयांची संबंधित यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना अवगत करून सातत्याने पाठपुरावा करावा. ग्रामीण भागात वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत असून ही थांबवण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने उभी करून व इतर प्रकारे अतिक्रमण केले जात असल्याने अपघात घडत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपापल्या मालकीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करणे आवश्यक आहे. तसेच मुख्य रहदारीच्या रस्त्यांवरील अवैध पार्किंग विरुद्ध कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधरकांविरूद्ध धडक मोहीम उघडण्यात यावी. अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, रस्त्यावर होणारे पार्किंग यावर दंडात्मक कारवाई करून पुढील बैठकीत याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.