दिव्यांगांना सन्मानपूर्वक वागणूक द्या : बडोले

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.19 : दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांचा सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सन्मानपूर्वक वागणुकीमुळे त्यांच्यातील न्यूनगंड संपुष्टात येऊन त्यांना प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आयोजित दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क साहाय्यक उपकरणे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृउबा समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी, उपसभापती लायकराम भेंडारकर, पं.स.च्या उपसभापती करुणा नांदगावे, जि.प.च्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, तेजुकला गहाणे, रघुनाथ लांजेवार, रामदास कोहाडकर, केवलराम पुस्तोडे, चामेश्वर गहाणे, होमराज ठाकरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे उपस्थित होत्या. .

बडोले म्हणाले, जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची गोंदियातून सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प राज्यभर राबविला जाणार आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात उपकरणे वितरण शिबिर आयोजित केले असून याद्वारे २३०० दिव्यांगांना तीनचाकी सायकल, कुबडी, श्रवणयंत्र, काठी, स्मार्टफोन यासारखी उपकरणे मोफत दिली जात आहेत. यासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. शासनातर्फे १३ दिव्यांग खेळाडूंना नोकरी देण्यात आली. यासारख्या त्यांच्या हिताच्या विविध योजना शासन राबवित आहे. शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. या क्षेत्रात इमारती, वर्गखोल्या, शिक्षकांची उणीव आहे. शिक्षक मुख्यालयात राहात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. साथीच्या आजाराची लागण या दिवसात होते. दिव्यांगांचे शिक्षक आपले कर्तव्य चोख बजावत आहेत किंवा नाही, याविषयी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाहीत. याकडे महसूल व सहकार विभागाने लक्ष द्यावे. वनजमिनीवरील अतिक्रमणाचे पट्टे देण्याचे निर्देश देऊन ८ दिवसात हे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर बोरकर केले. प्रास्ताविक मिलिंद रामटेके यांनी केले. खंडविकास अधिकारी एन.आर.जमईवार यांनी आभार मानले..