ऑटो रिक्शा चालक-मालक संघाच्या तालुकाध्यक्षपदी मंदरे

0
18

गोरेगाव,दि.08ः- येथील ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेची निवडणूक रविवारी ७ ऑक्टोबर रोजी तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंचावर उत्साहात पार पडली. ज्यामध्ये संघाच्या तालुकाध्यक्ष पदावर विजय मंदरे  १४ मतानी विजयी झाले. संघटनेच्या वतीने गोंदिया जिल्हा ऑटो रिक्शा चालक-मालक संघाचे माजी अध्यक्ष हेमराज मुनेश्‍वर यांच्या अध्यक्षतेत तर सतिश समुद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सभेचे आयोजन करून निवडणूक घेण्यात आली. ज्यामध्ये तालुका अध्यक्ष पदासाठी संजय घोले, शैलेश जांभूळकर, यासिन शेख, संजय रंगारी, भूमेश राऊत व विजय मंदरे यांनी आपले अर्ज सादर केले होते. यावेळी शैलेश जांभूळकर, संजय घोले व भूमेश राऊत यांनी आपले अर्ज मागे घेतले.
तर इतर तिघांमध्ये निवडणूक घेण्यात आली. प्रसंगी ६0 जणांनी मतदानाचा हक्क बजावला असता यासिन शेख यांना ६ व संजय रंगारी यांना २0 मते मिळाली तर विजय मंदरे यांनी ३४ मते घेवून विजय नोंदविला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश ब्राम्हणकर यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी रसूल खान, लतिफ भाई, केशरीचंद मेर्शाम, राजेश ठाकूर, महेश सोनवाने, सैलेश जांभूळकर, सुनील लाडे, विलास जांभूळकर, मुनेश्‍वर येळणे, लोकचंद मेर्शाम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्की शहारे, विजय वाघाडे, डिलक्स मेर्शाम, चेतन बोकडे, किशोर जांभूळकर आदींनी सहकार्य केले.